Nandurbar
नंदुरबार : रस्त्याअभावी बांबूच्या झोळीतून गर्भवती महिलेला घेऊन जाताना नातेवाईक. (छाया : योगेंद्र जोशी)
नंदुरबार

नंदुरबार : गर्भवती महिलेची झोळीतच प्रसूती

पुढारी वृत्तसेवा

नंदुरबार : एका गर्भवती महिलेला रस्त्याअभावी बांबूच्या झोळीतून आणले जात असताना भररस्त्यात ओसाड डोंगरावर महिलेची झोळीतच प्रसूती झाल्याची घटना उघडकीस आली आहे. धडगाव तालुक्यातील तेलखेडी या अतिदुर्गम गावातील या घटनेवरून लोकप्रतिनिधी टीकेचे लक्ष बनले आहेत.

  • ना जायला रस्ता, ना चांगली आरोग्य व्यवस्था; येथील गरोदर महिलेला कळा यायला लागताच त्यांना झोळीतून प्रवास करावा लागत आहे.

  • गावात रस्ता नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

  • एका गर्भवती महिलेला झोळीतून घेऊन जाताना वाटेतच तिची प्रसूती झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • रस्ता नसल्याने येथील रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी जाताना विविध अडचणींना वारंवार तोंड द्यावे लागत आहे.

आदिवासी दुर्गम भाग म्हटले की, रस्त्याअभावी डोंगरदऱ्यांतून पायपीट करीत बांबूच्या झोळीतून रुग्णांची ने-आण करण्याचे दृश्य नेहमीचेच आहे. मात्र, कोट्यवधी रुपयांच्या योजना खर्च करूनही अनेक गाव-पाडे रस्त्याविना असल्याने पावसाळ्यात या गावातील नागरिकांची मोठी गैरसोय होते. अशाच तेलखेडी या अतिदुर्गम गावातील खुंटी पाड्यातील अर्चना पावरा या महिलेला प्रसूती कळा आल्याने तिला नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणणे आवश्यक होते. तथापि पावसामुळे या गावाचा संपर्क तुटला होता. तसेच कोणताही रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांनी बांबूची झोळी करून खांद्यावर पायपीट करीत अनेक किलोमीटर चालून तिला आणले. परंतु त्या महिलेचा त्रास वाढला आणि डोंगरदऱ्याच्या मार्गातच तिची प्रसूती पार पडली.

रस्त्याअभावी आदिवासींची दैना

रुग्णालयाबाहेर होणाऱ्या प्रसूतीची संख्या कमी कणण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्न केले जातात. असे असले तरी अनेक गाव, पाड्यांवर रस्तेच नसल्याने तिथे ॲम्बुलन्स पोहोचत नाहीत. तसेच शहरापर्यंत पोहोचण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने अशा घटना नेहमीच पुढे येतात. मात्र, परिस्थिती बदलणार तरी कधी, अशी भावना या गाव-पाड्यावरील नागरिकांकडून उपस्थित केली जात आहे.

SCROLL FOR NEXT