नंदुरबार : अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून नुकतेच निवडून आलेले एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी आणि जिल्हा परिषदेचे सभापती तथा त्यांचे चिरंजीव शंकर पाडवी यांच्यासह नऊ जणांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान पीडित महिलेने स्वतः मारहाणीची व्हिडिओ क्लिप व्हायरल करत न्यायाची मागणी केली आहे.
अक्कलकुवा पंचायत समितीचे सदस्य सुधीर गंगाराम पाडवी (४१, रा. सोरापाडा ता. अक्कलकुवा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या घरासमोरून जाणारा रस्ता खोदून तेथे ब्लॉक बसवा, असे चेतन पाडवी यास सांगितल्याच्या कारणावरून चेतन पाडवी, अंजू पाडवी, जेका पाडवी, विक्की पाडवी, आमदार आमशा पाडवी, मंगल पाडवी, शंकर पाडवी, तुकाराम वळवी, सचेंद्रसिंग चंदेल यांच्यासह अन्य ८० ते 100 अनोळखी व्यक्तींनी सामूहिक हल्ला केला. फिर्यादी व त्याचे नातेवाईक (साक्षीदार) यांना शिवीगाळ करत मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच साक्षीदार महिलेला बेदम मारहाण करत शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलेले आहे. यावरून आमदारांविरोधात अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, या मारहाणीत पंचायत समितीचे सदस्य सुधीर पाडवी, अविनाश वळवी आणि दोन महिला जखमी झाले. त्यांच्यावर अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात उपचार करून नंतर घरी पाठवण्यात आले. उपविभागीय अधिकारी दत्ता पवार यांनी पोलिस पथकासह भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.