नंदुरबार : मामाच्या गावाला जायचे म्हणून आई-वडिलांच्या सोबत बसची वाट पाहत उभ्या असलेल्या आठ वर्षीय बालकाला रिव्हर्स येत असलेल्या बसने जबर धडक दिल्यामुळे तो जागीच मरण पावल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवारी (दि.१८) शहादा बस स्थानकावर घडली. या अपघातानंतर उपस्थित प्रवाशांनी एकच संताप व्यक्त केला.
अधिक माहिती अशी की, शहादा तालुक्यातील मंदाना गावातील रहिवासी हरिश्चंद्र मोरे हे परिवारासमवेत बसची वाट पाहत उभे होते. इयत्ता दुसरीत शिकणारा त्यांचा आठ वर्षीय मुलगा रुद्र हरिश्चंद्र मोरे हा मामाच्या गावाला जायचे म्हणून आनंदात होता. परंतु त्याच प्रसंगी एम एच 20 बी एल 3109 क्रमांकाची बस तिथे आली आणि बस चालक हर्षल पाटील व वाहक महेंद्र पाटील यांनी बस मागे घ्यायला सुरुवात केली. परंतु वेगाने बस मागे आली आणि धडक बसून रुद्र रक्तबंबाळ झाला. धडक एवढी जबरदस्त होती की तेथील सिमेंटचा खांबही तुटून पडला. त्याप्रसंगी आवारातील सर्व प्रवासी धावून आले त्या लोकांनी तातडीने जखमी रुद्रला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तथापि, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
दरम्यान, पालकांचा आक्रोश पाहून उपस्थित प्रवाशांचे मन गहिवरून आले. एवढी धक्कादायक घटना घडत असताना मात्र शहादा बस आगारातील कोणीही जबाबदार अधिकारी घटनास्थळी आला नाही हे पाहून उपस्थित लोकांनी संताप व्यक्त केला. मयत मुलाच्या नातलगांनी देखील बेजबाबदार बस कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका घेतली. तथापि काही मान्यवर लोकांनी समजूत काढल्यानंतर सायंकाळी पुढील सोपस्कार करण्यात आले. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.