१००१ दाम्पत्यांच्या हस्ते पार पडला ऐतिहासिक प्रयागराज जलकुंभ महाआरती सोहळा Pudhari News Network
नंदुरबार

नंदुरबार | १००१ दाम्पत्यांच्या हस्ते पार पडला ऐतिहासिक प्रयागराज जलकुंभ महाआरती सोहळा

श्रद्धाळूंनी अनुभवला नंदुरबारच्या अध्यात्म क्षेत्रातील सुवर्णक्षण

पुढारी वृत्तसेवा

नंदुरबार - १००१ दाम्पत्यांच्या हस्ते प्रयागराज येथील महाकुंभ जलकलशाची महाआरती करण्याचा ऐतिहासिक सोहळा दि. 9 मार्च 2025 रोजी सायंकाळनंतर रात्री सात वाजता नंदुरबार शहरातील पोलीस कवायत मैदानावर अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. नंदुरबार जिल्ह्याच्या अध्यात्म क्षेत्रातील सुवर्णपान म्हणावा अशा या भव्य सोहळ्यात त्रिवेणी संगमावरील पवित्र गंगाजलच्या एक लाख बाटल्यांचे वाटप करण्याचा सुद्धा याप्रसंगी शुभारंभ करण्यात आला.

१००१ दाम्पत्यांच्या हस्ते पार पडला ऐतिहासिक प्रयागराज जलकुंभ महाआरती सोहळा

महाराष्ट्राचे मा. आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्ष डॉक्टर कुमुदिनी गावित, जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्ष डॉक्टर सुप्रियाताई गावित, अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे मा. आमदार शिरीष दादा चौधरी, त्यांच्या पत्नी तथा मा. नगरसेविका सौ अनिताताई चौधरी यांच्या सह 1001 दाम्पत्यांच्या हस्ते अत्यंत भावपूर्ण कलश पूजन आणि महाआरती करण्यात आली. अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) आयोजित या भव्य सोहळ्यात विविध संप्रदायातील साधू, संतांची उपस्थिती प्रमुख आकर्षण ठरले. हर हर महादेवाचा गजर करीत पुणेरी पथकाने सादर केलेल्या ढोल वाद्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनुलोम व भाजपा तसेच डॉ.विक्रांत मोरे परिवारातर्फे गंगाजल बाटल्यांचे घरोघरी जाऊन वाटप करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

एकतेचे दर्शन घडवणारा सोहळा

यावेळी व्यासपीठावरुन माजी आ.शिरीष चौधरी यांनी अनुलोमच्या मार्गदर्शनात प्रयागराज येथील जलकलश पूजन कार्यक्रमाची रूपरेषा सांगताना नंदुरबारला प्रथम मान दिल्याने आभार व्यक्त केले. आ.डॉ.विजयकुमार गावित म्हणाले की, आपल्या धर्मप्रथा रुढी या खऱ्या अर्थाने सेक्युलर आहेत त्या सर्व प्रकारच्या लोकांना एकत्रित आणत असतात. जात आणि पंथ विसरून 65 कोटी लोक संगमावरती स्नानाच्या निमित्त एकत्र आले; ही भारतीय संघटनात्मक शक्तीचा चमत्कार दर्शवणारी गोष्ट आहे. भारतीय लोक जात-पात विसरून एकत्र येतात, याचे हे मोठा उदाहरण म्हणता येईल. आपण नंदुरबार वासीयांनी सुद्धा याचा आदर्श घेतला पाहिजे. जात-पात विसरून यापुढेही सर्व जाती जमातींनी एकत्रित आले पाहिजे. आज नंदुरबारच्या या सोहळ्यामध्ये सर्व जाती पंथाचे लोक एकत्र आले आणि या कार्यक्रमाला एवढी मोठी उपस्थिती दिली; हे सुद्धा आपल्या नंदुरबारच्या एकतेचे लक्षण आहे. आजच्यानिमित्त आपण प्रत्येकाने आपली ही सामाजिक एकता दीर्घकाळ टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने एक संकल्प करूया, असेही आवाहन डॉक्टर विजयकुमार गावित यांनी याप्रसंगी केले.

मुख्यमंत्र्यांनी संदेश पाठवित केले कौतुक

आपल्या भाषणातून डॉक्टर विजयकुमार गावित यांनी जाहीरपणे सांगितले की, नंदुरबार येथे 'अनुलोम' आणि विविध हिंदु संघटनांच्या मदतीने आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभ जलकलशाच्या महाआरती सोहळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,नुकताच प्रयागराज येथे संपन्न झालेला महाकुंभ हा संस्कृती आणि सभ्येतेचे दर्शन घडविणारा सोहळा होता. आ.डॉ.विजयकुमार गावित, जिजामाता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.विक्रांत मोरे, ॲड.राऊ मोरे, माजी आ.शिरिष चौधरी यांनी अनुलोमच्या मदतीने नंदुरबारमध्ये आयोजित केलेला हा धार्मिक कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय एकात्मता आणि समरसतेचे उदाहरण आहे; या शब्दात उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

या साधू संतांची लाभली उपस्थिती


व्यासपीठावर भागवताचार्य रविंद्र पाठक महाराज (नंदुरबार), गणेश जोशी महाराज चौपाळे, चंद्रकांत रोडे महाराज भालेर, निताईपारदास महाराज कुकरमुंडा, दशरथ महाराज भादवड, गुमानसिंग महाराज, सुकवेल, जानी महाराज, नंदुरबार, कुलकर्णी महाराज नंदुरबार, दवे महाराज नंदुरबार, आरती दिदी, दिलादास महाराज शेही, गिरीष महाराज लहान शहादा, संतोष महाराज जोगनीपाडा, कौसल्या माताजी धानोरा, गावंजी महाराज, रेवंता महाराज, माधव श्यामसुंदर नंदुरबार, भद्रसेन प्रभूजी नंदुरबार, सुदर्शनदास प्रभूजी नंदुरबार, ईश्वर महाराज नंदुरबार, विश्वदास महाराज देवलीपाडा, बलदेवजी महाराज नंदुरबार, योगिता दिदी नंदुरबार, देवेंद्र पांढारकर शनिमांडळ या साधू, महंतांची उपस्थिती होती.

क्रिकेट सामना असूनही लाभला प्रचंड प्रतिसाद

भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट सामना असल्यामुळे शहरातील रस्ते चक्क निर्मनुष्य बनले होते तरीही जल कलश सोहळ्याला मात्र प्रचंड उपस्थिती दिसली. क्रिकेट वरती धर्मश्रद्धेने मात केल्याचे एका अर्थाने पाहायला मिळाले. प्रयागराज येथील महाकुंभ जलकलश मध्यप्रदेश येथून प्रथमच नंदुरबारमध्ये दाखल झाले. महाराष्ट्रात जलकलश आरतीचा पहिला मान नंदुरबार शहराला मिळाला. यामुळे या कार्यक्रमाबाबत शहरवासीयांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून होती. सायंकाळी सहा वाजेपासून भाविकांनी पोलीस कवायत मैदानावर हजेरी लावली. महाकलश आरतीला १००१ दाम्पत्यांसाठी सर्वात पुढे बसण्याची व्यवस्था होती.तर स्वयंसेवक कार्यक्रमस्थळी त्रिवेणी संगमावरून आणलेल्या गंगाजल बाटल्यांचे वाटप करीत होते. कार्यक्रमाला माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित,डॉ.कुमूदिनी गावित, डॉ.सुप्रिया गावित, माजी आ.शिरीष चौधरी, युवा नेते डॉ.विक्रांत मोरे, हेमलता शितोळे, अनुलोमचे स्वानंद ओक, प्रीतम निकम, अविनाश माळी आदी उपस्थित होते. ॲड. प्रितम निकम यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT