नंदूरबारसारख्या अतिदुर्गम भागात मैलोनमैल पायी प्रवास करुन तर कधी स्वत: होडी वल्हवत कुष्ठरोग शोधमोहिमेत आशासेविका जानू वसावे आणि अंगणवाडी सेविका वैशाली वळवी ह्या आपले कर्तव्य बजावत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत दुर्गम गावांचा समावेश असलेल्या भागात ही कुष्ठरोग सर्व्हेक्षण मोहिम राबवण्यात आली. आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नर्मदा नदी किनारी दुर्गम आणि अती दुर्गम गावपाड्यावर जाऊन कुष्ठरोग शोधमोहिम राबवली. आशासेविका आणि अंगणवाडी सेविका यांची मदत या शोधमोहिमेत घेण्यात आली आहे.
दुर्गम, अतीदुर्गम भागात कधी पायी तर कधी होडीने करावा लागतोय प्रवास.
संशयित रुग्णांना आरोग्य केंद्रापर्यंत आणण्याचे काम आशासेविका आणि अंगणवाडीसेविका करत आहेत.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत प्रमुख घटकांपैकी एक म्हणजे आशासेविका आणि अंगणवाडी सेविका या कर्तव्य बजावत आहेत.
या मोहिमेत नर्मदा नदी किनाऱ्यावरील अतीदुर्गम भागात गावपाड्यात जबाबदारीने कर्तव्य बजावणाऱ्या सिंधुरी येथील आशासेविका जानू वसावे आणि अंगणवाडी सेविका वैशाली वळवी यांचे कार्य उल्लेखनीय आहे. अक्कलकुवा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सातपुडा पर्वतरांगेत अतीदुर्गम भागात पाड्यावर, वस्त्या, वाडी येथे ही मोहीम यशस्वीपणे राबवली जात आहे. गमन सिंधूरी गावातील मोवाडकुंडी पाडा येथील 200 घरांच्या सर्व्हेक्षणासाठी अशासेविकांना स्वत: होडी वल्हवत जावे लागले.
सरदार सरोवर धरणाचे पाणी, नदी नाले यांचे पाणी आहे. त्यामुळे दुर्गम भाग असलेल्या ठिकाणी दळणवळणाची समस्या असते. ज्याठिकाणी जात येत नाही, अशाठिकाणी होडीत बसून होडी स्वत: वल्हवत दुसऱ्या किनाऱ्यावर जावे लागते. मी दुर्गम भागातील पाड्यावर काम करत आहेत. माझ्या भागात एकूण 11 माणसांच्या अंगावर कुष्ठरोगाचे चट्टे आढळले आहेत. याबाबतचा अहवाल आरोग्य विभागाला दिलेला आहे.जानू वसावे, आशासेविका.
नर्मदा नदीच्या बॅक वॉटरने वेढलेल्या पाड्यावर पायी जाणे शक्य नाही. अशा ठिकाणी या सेविका स्वत:च्या हाताने लहान होडी वल्हवत पाड्यापाड्यातील घराघरापर्यंत पोहचून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी करत आहेत. शरीरावर संशयित लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तींना आरोग्य केंद्रापर्यंत आणण्याचे कर्तव्य त्या पार पाडत आहेत. येथील काही गावागावात गेल्यानंतर रुग्णवाहिकेचा सायरन वाजवला जातो. त्यानंतर ग्रामस्थांना समजते की, वैद्यकीय अधिकारी, सहकारी आले आहेत. त्यानुसार लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळून सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.
माझ्या अंगणवाडीमध्ये एकूण 55 लाभार्थी आहेत. गरोदर आणि 15 स्तनदा माता आहेत. आशावर्करसोबत काम करत कुष्ठरोगींची तपासणी केली आहे. संशयित रुग्णांना आरोग्य केंद्रापर्यंत आणण्याचे काम केले जात आहे.वैशाली वळवी, अंगणवाडीसेविका.
नंदुरबार जिल्ह्यातील अती दुर्गम भागात महाराष्ट्र शासनाच्या योजना, सुविधा गावागावात, पाड्यापर्यंत पोहचविण्याचे अवघड कार्य करत कर्तव्याप्रती सजग असलेल्या दृढनिश्चयी कर्मचाऱ्यांमुळे शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचविणे शक्य झाले आहे.
नंदूरबार येथील मनीबेली, धनखेडी, चिमलखेडी, गमन, सिंधुरी, केवडी, कोकरी बाजार, आरेठी, आकराळे या नऊ गावांमध्ये एकूण 221 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या नऊ गावांमध्ये आशासेविका आणि अंगणवाडीसेविका यांच्या मार्फत कुष्ठरोग रुग्णांचा सर्व्हे करण्यात आला. तर 126 बाह्य तपासण्या करण्यात आल्या. दुर्गम भाग असल्याने काही गावपाड्यावर 200 ते 300 किलोमीटरपर्यंत पायी जावे लागले. त्यानंतर माहिती अहवाल तयार करण्यात आला. बऱ्याचशा भागात लोकांना साधारण चट्टा असला तरी त्याला संशयित रुग्णांमध्ये नोंद करुन घ्यावी, याबाबत आम्ही आशाकार्यकर्ती आणि स्वयंसेविका यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानंतर नोंद झालेल्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी आमचे वैद्यकीय अधिकारी, सहकारी यांनी पुढाकार घेत रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. आतापर्यंत गमन या गावातील 6 ते 7 रुग्ण पूर्णत: बरे झाले आहेत.- डॉ. अनिल पाटील, दुर्गम भागातील चीमलखेडी, आरोग्य केंद्र, वैद्यकीय अधिकारी.
दुर्गम भागातील गावागावात जाऊन सर्व्हेक्षण करुन दिलेल्या प्रशिक्षणानुसार संशयित कुष्ठरोग रुग्णांना शोधून त्यांच्या बाह्य लक्षणावरुन लिस्ट तयार करुन त्याचा अहवाल आरोग्य केंद्रात सादर केली जात आहे. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत संशयित रुग्णांची तपासणी करुन त्यांचे निदान केले जात आहे.ज्ञानेश्वर वीर, आरोग्य सहाय्यक.
राज्यात कुष्ठरोगाचे निर्मूलन अद्यापही झालेले नाही. मागील पाच वर्षांत राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून 98 हजार 350 कुष्ठरुग्णांची नोंद झाली आहे. तर, यावर्षी ही संख्या 15 हजार इतकी आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या आजाराचे निर्मूलन करण्याचे आव्हान अजूनही कायम आहे. आशासेविकासह अंगणवाडी कार्यकर्ते आणि पुरुष स्वयंसेवकांच्या मदतीने ग्रामीण तसेच शहरातील अती दुर्गम भागांमध्ये घरोघरी सर्वेक्षण करून 30 टक्के लोकसंख्येमध्ये कुष्ठरुग्ण शोधण्यासाठी मोहीम राबवली जात आहे.
राज्यात अधिकाधिक नवीन कुष्ठरुग्ण शोधण्यासाठी कुष्ठरुग्ण कर्मचारी व सार्वजनिक आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी वाडीवस्ती, दाटीवाटीच्या शहरी भागांना भेटी देऊन प्राथमिक स्तरावरील कुष्ठरुग्ण शोधून काढले आहेत. कुष्ठरोग शोध मोहिमेंतर्गत 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये 6 हजार 744 नवीन कुष्ठरुग्ण आढळले. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशीव, यवतमाळ, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या निवडक 20 जिल्ह्यांमध्ये 31 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये ही मोहीम राबवण्यात आली होती.
कुष्ठरोगाचे रुग्ण शोधण्यासाठी कुसुम या मोहिमेचीही सुरुवात करण्यात आली आहे. कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र या मोहिमेमध्ये आश्रमशाळा, वसतीगृहे, वीटभट्टी, खाणकामगार, कारागृहातील व्यक्ती तसेच विविध कारणांमुळे स्थलांतरित झालेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यासाठी कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) ही मोहीम 16 ते 20 डिसेंबर 2024 मध्ये राबवण्यात आली. यामध्ये 1,022 नवीन रुग्ण आढळले आहेत. स्पर्श मोहिमेंतर्गत 26 जानेवारी रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये घेण्यात आलेल्या ग्रामसभेत तसेच सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये कुष्ठरुग्ण शोधण्याबद्दल प्रतिज्ञा घेण्यात आली होती.
कुसुम या मोहिमेअंतर्गत पिडीत रुग्णांचा शोध घेण्यात आला. बऱ्याचशा रुग्णांना कुष्ठरोगाबद्दल काहीच माहिती नसल्याने अंगावरील असलेला चट्टा कसला या व्याधीबाबत काहीच माहिती नव्हती. त्यामुळे त्यांच्यामध्ये असलेली भिती दूर करुन रुग्णांचा विश्वास संपादन केल्यानंतर लोकांना सविस्तर माहिती देऊन कुष्ठरोग आणि त्यावर खात्रीशीर उपाय याबाबत समजावून सांगण्यात आले. कुष्ठरोगाबद्दल घाबरण्याचे कारण नाही, असे लोकांना समजावून सांगितल्यानंतर त्यांनी स्वत:हून होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती दिली. यामध्ये वयस्कर आणि जुने व्याधी असलेले रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले. एका रुग्णाला संपूर्ण बरे होण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागतो. परंतु, वेळेवर उपचार घेतले तर सुरुवातीच्या दोन महिन्यातच फरक जाणवायला लागतो.
दुर्गम भाग असल्याने बऱ्याच ठिकाणी दळणवळणाच्या समस्या भेडसावत आहेत. पाड्यापाड्यावरील अंतर लांब असल्याने व रस्ते नसल्याने बरेचसे अंतर पायी चालून जावे लागते. पावसाळ्यात तर रस्ते वाहून जातात. साधारणत: तीन तास चालून गेल्यानंतर गावात पोहचल्यावर कामानिमित्ताने लोक घरात मिळून येत नाही. त्यामुळे वेळेचा अपव्यव होत आहे. ऊसतोडीसाठी घरातील कर्ते पुरुष आणि महिला घराबाहेर पडत असल्याने त्यांची तपासणी वेळेवर होत नाही. भर उन्हातही पायी चालून गेल्यानंतर पाड्यावरील झोपडीत घरात केवळ म्हातारे व्यक्ती मिळून येतात. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची तपासणी करण्यासाठी होळी सारख्या सणाची वाट पहावी लागते. जेणेकरुन सगळ्यांची तपासणी होऊ शकेल.