नंदुरबार

जनजाती गौरव दिन : आदिवासी नृत्य पथकांसमवेत मंत्री, खासदार अन् झेडपी अध्यक्षांनीही धरला ताल

गणेश सोनवणे

नंदुरबार ; पुढारी वृत्तसेवा; जनजाती गौरव दिन सोहळ्याच्या निमित्ताने आज दि. 16 नोव्हेंबर रोजी राज्याच्या विविध भागातून आलेल्या आदिवासी नृत्य पथकांनी महारॅली काढून सादर केलेल्या वैविध्यपूर्ण कलाप्रकारांना पाहून आज नंदुरबार वासी भारावून गेले. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांच्यासह अनेक मान्यवरांना देखील मोह अनावर झाला आणि त्यांनी देखील नृत्यात सहभाग घेतला.

नंदुरबार येथील जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर (दि. 15) भगवान  बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित जिल्हा क्रीडा संकुल येथे या राज्यस्तरीय जनजातीय गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सलग तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने महाराष्ट्राच्या विविध भागातील आदिवासी ग्रामस्थ आणि कला संस्कृती क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहिले. या महोत्सवाच्या ठिकाणी 32 नृत्य पथकातील 800 हून अधिक कलाकार आपली कला सादर करतील. त्यांच्या स्पर्धेत प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या पथकांना पुरस्कार देण्याचा सोहळा आणि समारोप उद्या दिनांक 17 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. औषधी वनस्पती पासून बनवलेल्या औषधी,  आदिवासी भागातील विविध खाद्यपदार्थ त्याचबरोबर बांबू वगैरे पासून बनविलेल्या वस्तू यासह हस्तकलेचे वैविध्य सादर करणारे 200 स्टॉल लावण्यात आले आहेत.

त्या अंतर्गतच सहभागी झालेल्या विविध नृत्य पथकांचे कला प्रदर्शन करणारी महारॅली आज 16 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजेपासून दुपारी एक वाजेपर्यंत काढण्यात आली. महाराष्ट्राच्या विविध भागातील आदिवासी कला संस्कृती नृत्य आणि पोशाख याचे दर्शन घडवणारे नृत्य प्रकार आणि वाद्य साहित्य यामुळे अनोखी वातावरण निर्मिती झालेली पाहायला मिळाली.

ही रॅली चालू असताना पथकांच्या समावेत ताल धरून अनेक ठिकाणी खासदार डॉक्टर हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर कुमुदिनी गावित, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संचालिका चंचल पाटील, भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी प्रमुख सविता जयस्वाल,  एडवोकेट जयश्री वळवी यांनीही नाचण्याचा आनंद लुटला. स्वतः आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी काही ठिकाणी ढोल लेझीम च्या तालावर नाचण्याचा आनंद घेतला तसेच प्रत्येक पथका समवेत छायाचित्र काढण्याला प्रतिसाद देत पथकांचा उत्साह द्विगुणित केला.

एकही समाज आदिवासींमध्ये समाविष्ट केला जाणार नाही : मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिली पुनश्च ग्वाही

रॅली संपल्यानंतर आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पथकातील कलावंतांना संबोधित केले. ते म्हणाले की,  इतक्या मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या विविध भागातून आदिवासी कलापथकांनी नंदुरबार येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय जनजाती गौरव दिनाला उपस्थिती दिली त्याबद्दल आभारी आहे. शोभा यात्रेच्या माध्यमातून आपण सर्वांनी आणि शहरवासीयांनी जी एकता दाखविली ती कौतुकास्पद आहे. आपण सादर केलेल्या कलाप्रकारांना शहरवासीयांनी भरभरून दाद दिली. समस्त आदिवासी बांधवांनी याच प्रकारे एकता टिकवून ठेवायची आहे संघटित राहायचे आहे आदिवासी समाजामध्ये कोणत्याही अन्य समाजाचा समावेश केला जाणार नाही याची मी पुनश्च ग्वाही देतो; असे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT