ठळक मुद्दे
नंदुरबारच्या अक्कलकुवा येथील जामिया शिक्षण संस्थेवर ईडीची मोठी कारवाई
या ठिकाणी यमन देशातील विदेशी नागरिकांच्या कुटुंबियांचे अवैध वास्तव्य असल्याचे आढळले
जामिया इस्लामिया इशातुल उलूम ही संस्था वादाच्या भोवऱ्यात; केंद्रीय तपास यंत्रणेने थेट कारवाई केल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले
नंदुरबार : अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया इशातुल उलूम विद्यापीठावर सोमवारी (दि.1) ईडीने छापे टाकले आहेत. परंतु अधिकारी स्तरावरून याबाबत प्रचंड गुप्तता पाळली जात असल्यामुळे अद्याप त्याविषयीची अधिकृत माहिती हाती आलेली नाही. या संस्थेला विदेशातून आर्थिक मदत मिळत असून, विद्यापीठाच्या रुग्णालयाच्या कामकाजात अनियमितता असल्याची तक्रार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली होती.
अक्कलकुवा शहरातील काही व्यक्तींकडे, जामिया इस्लामिया परिसरात तसेच खापर येथे दिल्ली, मुंबई येथून ईडीच्या काही वाहनांचे ताफे पहाटेला धडकले आणि अधिकाऱ्यांच्या पथकांनी तपासणी सुरू केली. ही तपासणी दिवसभर सुरू होती.
बंदोबस्ताला त्यांच्यासोबत एसआरपी जवानांचे पथक होते. परंतु स्थानिक पोलिस ठाण्यात अथवा नंदुरबार येथील पोलिस मुख्यालयाला त्याविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही अथवा पूर्वसूचना देण्यात आलेली नाही, असे स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ईडी म्हणजे आर्थिक संचालनालयाच्या पथकांनी अचानक ही छापेमारी सुरू केल्याचे म्हटले जात आहे. नंदुरबार शहरातदेखील अशी तपासणी झाल्याची व्यापारी वर्तुळात चर्चा आहे.
चार दिवसांपूर्वीच अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया इशातुल उलूम विद्यापीठावर आर्थिक आणि नियामक अनियमितता, परदेशी निधी, धर्मांतरण आणि अवैध विदेशी नागरिक राहत असल्याच्या आरोपांमुळे कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने एफसीआरए (FCR) रद्द केल्यानंतर विद्यापीठाची ११० कोटी रुपयांची मालमत्ता ताब्यात घेतली असून, संस्थेच्या कामकाजावर देखरेखीसाठी एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे.
मुख्य आरोप आणि कारवाई : आर्थिक अनियमितता
विद्यापीठावर एफसीआरए कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे आणि त्याची परदेशी निधीची चौकशी सुरू आहे. अवैध विदेशी नागरिकः विद्यापीठात बांगलादेश आणि येमनमधील बहुतेक विद्यार्थी अवैधपणे राहत असल्याचा आरोप आहे आणि त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जमीन जप्त करणेः विद्यापीठाने आदिवासी जमीन हडपल्याचा आरोप आहे.