नंदुरबार : माघारीच्या अंतिम मुदतीत भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. हीना गावित यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवे अक्कलकुवा मतदारसंघात यंदा चुरशीची लढाई रंगणार आहे. काँग्रेसचे माजी मंत्री के. सी. पाडवी, शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य आमशा पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी हे अन्य प्रमुख उमेदवार येथे रिंगणात आहेत. दरम्यान डॉ. हीना गावित यांनी भाजपच्या पदांचा राजीनामा दिला आहे.
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार ॲड. के. सी. पाडवी हे सातव्यांदा काँग्रेसतर्फे उमेदवारी करीत आहेत. महायुतीतर्फे शिंदे शिवसेना गटाचे विधान परिषद सदस्य आमशा पाडवी यांची उमेदवारी दाखल आहे. तथापि या जागेवर महायुतीमधील भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या तथा माजी खासदार डॉ. हीना गावित यांनीही उमेदवारी दाखल केल्याने महायुतीमध्ये पेच निर्माण झाला होता. शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांनी केलेली गद्दारी थांबवलेली नाही म्हणून आपण उमेदवारी कायम ठेवत असल्याचा खुलासा डॉ. हीना गावित यांच्याकडून करण्यात आला.
दरम्यान माध्यमांना माहिती देताना डॉ. हीना गावित म्हणाल्या की, नंदुरबार विधानसभा मतदारसंघात डॉ. विजयकुमार गावित हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत, तरीही शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हा नेते महायुतीमध्ये सक्रिय न राहता उघडपणे विरोधी पक्षाच्या उमेदवाराला बळ देत आहेत. शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी गद्दारीची भूमिका सोडलेली नाही. म्हणून अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून मी माझी उमेदवारी कायम ठेवली आहे. राजकीय संकेत पाळून मी भाजपच्या पदांचा राजीनामा पाठवत असल्याचे त्यांनी सांगितले.