नंदुरबार: सप्टेंबर आणि ऑक्टोबर - 2025 महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी आदिवासी विकास मंत्री आणि विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील सर्व सहा तालुके अतिवृष्टीग्रस्त तालुके म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार या तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी नुकसानभरपाई आणि विविध सवलतींसाठी पात्र ठरणार आहेत. सप्टेंबर महिन्यातील पावसामुळे सुमारे २ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे दीड हजार हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या नुकसानीत आणखीच भर पडली आहे.
या परीस्थितीची तातडीने दखल घेत डॉ. विजयकुमार गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी पाहणी करून पंचनाम्यांचे आदेश दिले. त्यानंतर शासनाने मदतीचा निर्णय जाहीर केला आहे.
शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सवलती अशा...
जमीन महसूलात सूट
सहकारी कर्जाचे पुनर्गठन
शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीस एक वर्षाची स्थगिती
तिमाही वीज बिलात माफी
परीक्षा शुल्क व दहावी–बारावी विद्यार्थ्यांची फी माफी होणार
आर्थिक मदत आणि भरपाई अशी...
रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टर ₹१०,००० (३ हेक्टर मर्यादेत) मदत थेट बँक खात्यात
मृत व्यक्तीच्या वारसांना ४ लाख रुपये
४०–६० टक्के, अपंगत्वासाठी ७४,००० रुपये
६० टक्के पेक्षा अधिक अपंगत्वासाठी २.५ लाख रुपये
जखमी व्यक्ती (१ आठवड्यापेक्षा अधिक रुग्णालयात) १६,००० रुपये
(१ आठवड्यापेक्षा कमी) ५,४०० रुपये
घर पडझड व पशुधना नुकसान भरपाईबाबत...
घरांचे नुकसान:
सपाट भाग १,२०,००० रुपये
डोंगराळ भाग १,३०,००० रुपये
पक्के घर ६,५०० रुपये कच्चे घर ४,००० रुपये झोपडी ८,००० रुपये
गोठा: ३,००० रुपये
दुधाळ जनावरे: ३७,५०० रुपये प्रति जनावर
ओढकाम जनावरे: ३२,००० रुपये
लहान जनावरे: २०,००० रुपये
शेळी/मेंढी: ४,००० रुपये
कुक्कुटपालन : १०० रुपये प्रति कोंबडी
शेतीपिकांच्या नुकसान भरपाई अशी...
जिरायत पिके: ८,५०० रुपये प्रति हेक्टर
बागायत पिके: १७,००० रुपये प्रति हेक्टर
बहुवार्षिक पिके: २२,५०० रुपये प्रति हेक्टर
(तीन्ही बाबतीत ३ हेक्टर मर्यादा लागू)
नैसर्गिक आपत्तीत शेतजमिनीवरील गाळ काढणे: १८,००० रुपये प्रति हेक्टर
दरड कोसळणे, जमीन खचणे इत्यादींसाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ४७,००० रुपये प्रति हेक्टर
या सर्व निर्णयांमुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले आहे.