नंदुरबार

तोरणमाळच्या पर्यटनाला येतील सुगीचे दिवस : डॉ. विजयकुमार गावित

गणेश सोनवणे

नंदुरबार : पुढारीवृत्तसेवा- तोरणमाळ या पर्यटन तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा म्हणून पूर्वीपासूनच आमचे प्रयत्न राहिले आहेत आणि आता विद्यमान स्थितीत देखील या दुर्गम भागातील बचत गटांना त्याच दृष्टिकोनातून प्रोत्साहन देणे सुरू आहे. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून रस्ते जोड योजना राबवणार आहे. तोरणमाळ पासून ते शेवटच्या टोकावरील भादल गावापर्यंत वीज पोहोचावी म्हणून 33 केवी उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. त्याचबरोबर तोरणमाळ भागातील विविध विकास कामांसाठी 400 कोटी रुपये मंजूर असून त्यापैकी 200 कोटी रुपये येत्या काही दिवसात प्राप्त होतील आणि त्यातून विविध कामे सुरू झालेली दिसतील; अशी माहिती देऊन आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी तोरणमाळच्या पर्यटन विकासाला भरभक्काम चालना देणार असल्याची ग्वाही दिली.

नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथे आज दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्राच्या पर्यटन संचालनालय आणि वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी पर्यटन महोत्सव तोरणमाळ हा एक दिवसीय महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित होते. त्या प्रसंगी अध्यक्षीय भाषणातून त्यांनी ही माहिती दिली.

पर्यटन संचालनालयाच्य उपसंचालिका मधुमती सरदेसाई, कृषी पर्यटन तज्ञ पांडुरंग तावरे, नंदुरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर हुमणे, मविम च्या वरिष्ठ अधिकारी कांता बनकर, धडगावचे सुभाष पावरा, पंचायत समिती सदस्य रतिलाल नाईक, तोरणमाळचे सरपंच इंदुबाई चौधरी, नगरसेवक संतोष वसईकर, पर्यटन संचालनालयाचे कल्पेश पाडवी तसेच तोरणमाळ भागातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विविध प्रकारचे आदिवासी नृत्य सादर करणारे पथक, त्या भागात पर्यटनाला आलेले एक दांपत्य, स्ट्रॉबेरी सारखे निराळे कृषी प्रयोग राबवणारे शेतकरी आणि अन्य यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. महोत्सवाच्या उद्घाटनाआधी आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मान्यवरांसमवेत लावण्यात आलेल्या प्रत्येक स्टॉलवर भेट दिली आणि स्टॉल धारक बचत गटाच्या महिलांशी संवाद साधून विविध योजनांच्या माध्यमातून उद्योग आणि प्रकल्प कसा विकसित करता येईल याचे मार्गदर्शन केले.

दरम्यान, अध्यक्षीय भाषणात आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून तोरणमाळ सर्वत्र ओळखले जाते परंतु म्हणावा तसा विकास या पर्यटन स्थळाचा आजपर्यंत होऊ शकलेला नाही. जेव्हा केव्हा आम्ही चांगले प्रयत्न करून या भागासाठी विकास कामे आणली तेव्हा निराळे राजकीय हेतू बाळगणाऱ्यांनी त्यात कायम खोडा घातला. परिणामी या भागाचा विकास झालेला नाही. तथापि आता आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून बिरसा मुंडा रस्ते जोड योजना राबवली जात आहे आणि त्यामुळे तोरणमाळ परिसरातील सर्व दुर्गम पाडे पर्यटनाच्या दृष्टीने संपर्कात येतील. या भागातील उंच शिखर जोडणारे झुलते पूल करावे, डंकी जम्पिंग ची व्यवस्था करावी, तोरणमाळ भागात बोटिंग व्यवसाय विकसित करावा अशा विविध कामांना चालना दिली तर पर्यटन वाढू शकते. त्यादृष्टीने आपला सतत प्रयत्न राहणार आहे परंतु विद्यमान स्थितीत या भागातील लोकांच्या घरात वीज पोहोचावी म्हणून 33 केवी उपकेंद्र मंजूर करण्यात आले असून लवकरच त्याचे काम होईल. मंजूर करण्यात आलेल्या 400 कोटी पैकी 200 कोटी रुपयांचा निधी लवकरच प्राप्त होणार असून विकास कामांना वेग दिला जाईल. येथील बचत गटांना केंद्रीय अर्थसहाय्य योजनेतून चालना देऊन प्रक्रिया उद्योग विकसित केले जातील, असे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले.

तत्पूर्वी तोरणमाळ पर्यटन महोत्सवाच्या आयोजना मागची भूमिका पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका मधुमती सरदेसाई यांनी आपल्या भाषणातून विशद केली. महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात कृषीतज्ञ पांडुरंग तावरे यांनी कृषी पर्यटनाची सविस्तर माहिती दिली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT