चेतक महोत्सव ग्लोबल करण्यासाठी कटिबद्ध File Photo
नंदुरबार

Nandurbar News : चेतक महोत्सव ग्लोबल करण्यासाठी कटिबद्ध

सारंगखेडा : पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावळ यांची ग्वाही

पुढारी वृत्तसेवा

Committed to making Chetak Festival global

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

सुमारे चारशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेली आणि पिढ्यान्पिढ्या आपला सांस्कृतिक ठेवा जपून ठेवणारी सारंगखेडा यात्रोत्सवानिमित्त होणाऱ्या चेतक महोत्सवाला ग्लोबल करण्यासाठी महाराष्ट्र शासन भक्कमपणे चेतक महोत्सव समितीच्या पाठीशी असल्याची ग्वाही राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावळ यांनी दिली. गुरुवारी (दि. ४) सारंगखेडा येथे दत्तजयंतीनिमित्त भरणाऱ्या यात्रोत्सव व चेतक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, तहसीलदार दीपक गिरासे, शहादा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अभिजित पाटील, चेतक महोत्सवाचे प्रमुख आयोजक जयपालसिंह रावळ, सरपंच पृथ्वीराज रावळ प्रणवराज रावळ आदी उपस्थित होते.

मंत्री रावळ म्हणाले, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांना व्यापून असलेल्या पवित्र तापी नदीच्या तीरावर हा महोत्सव आणि यात्रोत्सव शेकडो वर्षांपासून आपली परंपरा घेऊन डौलाने उभा आहे. दत्तप्रभूच्या उपासनेसोबत या महोत्सवाला जगद्विख्यात अशा अश्वमेळा व पशुमेळ्याची रूपेरी किनार लाभली आहे. दररोज सुमारे ७५ हजार लोक या यात्रेला येतात. पूर्वी लोक बैलगाड्याने इथे येत असत; आज आपल्या आधुनिक वाहनांवर येतात तेही घोडे पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी. जिथपर्यंत नजर पोहोचत नाही, तिथपर्यंत विविध प्रकारचे अश्व या यात्रेत आलेले पाहायला मिळतात.

जगभरातून अश्वप्रेमी येथे येत असतात. आपण पर्यटनमंत्री असताना चेतक महोत्सवाला ग्लोबल करण्यासाठी; येथील धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले. सलग तीन वर्षे या यात्रेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. या महोत्सवाला अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही शासनाच्या वतीने प्रयत्नशील असल्याचे मंत्री रावळ यांनी यावेळी सांगितले.

अंबानींची महोत्सवाला येण्याची इच्छा

महोत्सव भारतीयांसह जगभरातील पर्यटकांना खुणावत असल्याचे सांगून, प्रसिद्ध उद्योजक अनंत अंबानी यांची या महोत्सवाला येण्याची इच्छा असल्याचेही मंत्री रावळ यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT