नंदुरबार : वादावादीचे पर्यावसान हाणामारीत झाल्या नंतर चक्क पोलिस ठाण्याच्या आवारातच दोन गटातील तरुणांनी राडा केला. बुधवार दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी रात्री घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. पहाटे पर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम चालू होते.
नंदुरबार शहरात काही महिन्याच्या अंतराने हत्या करण्याच्या घटना घडून गेल्यामुळे सध्या वातावरण संवेदनशील आहे. दोन आठवड्यापूर्वीच एका तरुणाची हत्या झाल्याची घटना ताजी आहे. अशातच काल रात्री झालेल्या हाणामारीमुळे नंदुरबारवासी पुन्हा हादरले आहेत.
प्राप्त माहितीनुसार आपसातील व्यवहारावरून बिनसल्यामुळे दोन जणांमधील वाद विकोपाला गेला. त्यावरून काल बुधवार रोजी रात्री काही जणांनी शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करायचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान पोलीस ठाण्याच्या आवारात दोन्ही गट एकमेकांना भिडले. प्रत्यक्ष दर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सापडेल त्याची धुलाई चालू असल्याचे पाहून जमलेली गर्दी देखील अवाक झाली होती. तथापि उपस्थित पोलिसांनी ताबडतोब हस्तक्षेप करून शांतता प्रस्थापित केली. सकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम चालू होते.