नंदुरबार : दादर ते भुसावळ धावणाऱ्या शून्य नऊ शून्य 51 क्रमांकाच्या रेल्वे गाडीतील वातानुकूलित डब्यांमध्ये घुसून आज (दि. 27) रोजी पहाटे लुटारू टोळीने पुन्हा धुमाकूळ घातला. गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांच्या किमती सामान असलेल्या बॅगा आणि किमती मोबाईल हिसकावून घेत या टोळीने पलायन केले. हादरलेल्या प्रवाशांनी नंतर रेल्वे पोलिसांचा शोध घेऊन घटनेची माहिती दिली. बी वन आणि बी टू या दोन वातानुकूलित डब्यांमध्ये हा प्रसंग घडल्याचे सांगण्यात आले.
नेहमीप्रमाणे हा थरारक प्रसंग गुजरात हद्दीतील चलथान ते बेस्तान रेल्वे स्थानका दरम्यान घडला, असे तक्रार करणाऱ्या प्रवाशांचे म्हणणे आहे. दादर ते भुसावळ धावणारी ही रेल्वे नंदुरबार स्थानकात पहाटे पावणे पाच वाजता पोहोचल्यानंतर येथील रेल्वे पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. दहा पेक्षा अधिक प्रवाशांचे सामान आणि मोबाईल गेले असून चोरीस गेलेला ऐवज लाखांच्या घरात असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तथापि गुन्हा नोंदणीची प्रक्रिया चालू असून याविषयीचे तपशील प्राप्त होणे बाकी आहेत.
दरम्यान, चलथान ते बेस्तान रेल्वे स्थानका दरम्यानची लुटमार थांबत नसल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. भुसावळ जळगाव अमळनेर दोंडाईचा नंदुरबार अशा सर्व प्रमुख शहरांमधील व्यापारी या मार्गावर प्रवास करत असतात त्याचबरोबर महत्त्वाच्या कामासाठी अधिकारी आणि व्यावसायिक देखील प्रवास करीत असतात अशावेळी त्यांच्याकडे महत्त्वाचे किमती सामान असते त्यांना लक्ष बनवून चलथान ते बेस्तान रेल्वे स्थानका दरम्यान लुटमारीचे प्रसंग घडवले जातात हे मागील काही वर्षात वारंवार घडले आहे असे असताना रेल्वे पोलिसांना या टोळीचा बंदोबस्त करण्यात यश का मिळालेले नाही हा प्रश्न केला जात आहे.