नंदुरबार -ज्याच्यामुळे पूर्वी लक्षावधी कोंबड्यांची कत्तल करायला भाग पडले होते त्या बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव यंदा पुन्हा नवापूर तालुक्यात आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपआयुक्त डॉ. संजय खाचणे यांनी तीन पोल्ट्री फार्म मधील तपासणी निष्कर्ष पॉझिटिव्ह आल्याचे म्हटले आहे.
पक्षांचे डोळ्यांच्या आजूबाजूस, मान, डोके, सुजलेले, नाकातून स्त्राव, तुरा, काेंब व पायाचे रंगात बदल होणे, अंडी उत्पादनात घट, अचानक कमकुवतपणा येणे, पंख खाली पडणे, हालचाल कमी होणे इ. बर्ड फ्लू रोगाचे सूचित लक्षणे आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुका हा महाराष्ट्रातील बर्ड फ्ल्यूचा महत्त्वाचा केंद्रबिंदू राहिला आहे. येथे सन 2006 मध्ये पहिला मोठा उद्रेक झाला होता आणि नवापूर हा महाराष्ट्रातील बर्ड फ्ल्यूचा पहिला सर्वात मोठा केंद्रबिंदू ठरला होता. त्यावेळी अन्यत्र कुठेही प्रसार होऊ नये म्हणून अंदाजे सुमारे 10 लाख कोंबड्यांची कत्तल करावी लागली होती. नंतर 2021 मध्ये पुन्हा तसाच उद्रेक होऊन बर्ड हॅलो मुळे लक्षावधी कोंबड्या मरण पावल्या. त्यावेळेसही अधिक प्रसार होऊ नये म्हणून जवळपास साडेतीन लाख कोंबड्यांची कत्तल करण्यात आली होती.
दरम्यान, पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायक्त डॉक्टर संजय खाचणे यांनी दिलेल्या माहितीनुसार बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भावाचे डायमंड, डॉन (तीन टेंबा) व तस्लीम पोल्ट्री फॉर्म, ता. नवापूर, जि. नंदुरबार या ठिकाणचे तपासणी निष्कर्ष पॉझिटिव्ह आले आहेत. आपल्या जिल्ह्यात या विषाणूजन्य रोगाचा संभाव्य प्रादुर्भावाचा प्रतिबंधात्मक उपयोजनेसाठी जिल्हयातील पशुपालक, कुक्कुटपालन व्यवसायिक, व्यापारी, दुकानदार व नागरिकांनी आप-आपल्यास्तरावर काटेकोरपणे जैवसुरक्षा प्रणालीचा अवलंबन करणे अत्यावश्यक आहे; असे आवाहन त्यांनी केले आहे.
पोल्ट्रीफार्म मध्ये कामकाज करणारे व्यक्तींनांच पोल्ट्रीफार्म मधील पक्षांच्या जवळ जाण्यास परवानगी देण्यात यावी, बाहेरील कोणतेही पक्षी/प्राण्यांना पोल्ट्रीफार्म मधील पक्षांमध्ये कोणत्याही परिस्थितीत समाविष्ट करू नये, पोल्ट्रीफार्म मध्ये कामकाज करणारे व्यक्तीचे बुट, कपडे व हात-पाय पोल्ट्रीफार्म मध्ये जाण्या अगोदर व बाहेर आल्यानंतर जंतुनाशकाचा वापर करून स्वच्छ करण्यात यावे. पोल्ट्रीफार्म मधील पक्षांचे पिंजरे स्वच्छ असावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या आहेत.