नंदुरबार - आसलोद गावात दारूबंदी करा; ही 2012 पासून लावून धरलेली मागणी आणि त्यासाठी चाललेले आंदोलन याला तब्बल बारा वर्षानंतर यश आले असून प्रशासनाने घेतलेल्या मतदानात आडव्या बाटलीचा 612 मतांनी विजय झाला. होय, चक्क आडवी बाटली आणि उभी बाटली या चिन्हावर बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्यात आले आणि त्यात आडवी बाटली अखेर जिंकली.. ही घटना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील आहे.
शहादा तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या असलोद गाव आणि परिसरात अवैध दारू विक्री वर्षानुवर्षे सुरू आहे. गावा जवळच्या मुख्य रस्त्यावर सुध्दा अनेक बियर बार आणि शॉपी सुरू आहेत. दारूमुळे गावातील तरुण पिढीवर परिणाम होत असल्याने दारूबंदीची मागणी स्थानिक लोकांनी लावून धरली. गावातील महिलांसह ग्रामस्थांनी गाव आणि परिसरात असलेल्या अवैध दारू विक्री कायम स्वरुपी बंद होण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. असलोद येथे दारूबंदीसाठी २०१२ पासून महिलांचे आंदोलन सुरू आहे. वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र दारूबंदी झालीच नाही. दरम्यान, महिलांप्रमाणेच सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन उचलून धरले होते. या लढ्याला यश येणार का? हा प्रश्नच होता..
अखेर जिल्हा प्रशासनाने गावातील महिलांच्या मागणी वर मतदान प्रक्रिया राबवण्याचा निर्णय केला आणि त्यानुसार दि. 8 डिसेंबर 2024 रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबवली. यात आडवी बाटली आणि उभी बाटली यावर मतदान घेण्यात आले. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदानासाठी महिलांच्या रांगा पाहायला मिळाल्या. गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. महसूल आणि पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. आज दिनांक 8 डिसेंबर रोजी सायंकाळी मतदान संपल्यानंतर लगेचच मतमोजणी घेण्यात आली रात्री जाहीर करण्यात आलेल्या निकालानुसार अखेर लढ्याला यश मिळाले.
एकूण १ हजार २१६ महिला मतदारांसाठी तीन बूथ निश्चित करण्यात आले होते. सकाळी ८ ते ५ दरम्यान मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. एकूण ६७७ महिलांनी मतदान केले. त्यात आडव्या बाटलीला तब्बल ६१२ मते मिळाली. दुर्दैवाने उभ्या बाटलीला सुद्धा ६५ मते मिळाली. बॅलेट पेपरवर ही मतदान प्रक्रिया तहसिलदार दिपक गिरसे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. पोलिस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक राजन मोरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. या प्रक्रियेत तीन पथकांसह ६ अधिकारी आणि १८ कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया राबविली. आडव्या बाटलीला विजय मिळाल्याने गावात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला.