बिबट्या  File photo
नंदुरबार

नंदुरबार : तळोदा तालुक्यात बिबट्याचा धुडगूस; दोन दिवसांत दोन बळी

वर्षभरातील हल्ल्यात तेरावा बळी; महिलेनंतर बिबट्याच्या हल्ल्यात दहा वर्षीय मुलगी ठार

पुढारी वृत्तसेवा

नंदुरबार : तळोदा तालुक्यात गुजरात आणि महाराष्ट्राच्या हद्दीवरील गणेश बुधावल येथे शनिवारी (दि.१६) बिबट्याने हल्ला करून महिलेचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच तळोदा तालुक्यातील सरदार नगर येथे रविवारी (दि.१६) आणखी एका दहा वर्षीय मुलीवर हल्ला करून बिबट्याने तिला ठार केल्याची घटना समोर आली आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात बळी जाणाऱ्यांची संख्या वाढत असताना वनविभाग पाहिजे तशी गांभीर्याने उपाययोजना करीत नसल्याबद्दल संतप्त भावना व्यक्त होत आहेत. तळोदा परिसरातील १० किमी परिघात बिबट्याच्या हल्ल्यात ९ जणांचा बळी गेला आहे, तर जिल्ह्यात वर्षभरात बिबट्याच्या हल्ल्यात गेलेला हा तेरावा बळी आहे.गणेश बुधावल शिवारात शनिवारी ललिताबाई अशोक पाडवी या त्यांचे पती अशोक पाडवींसमवेत आपल्या शेतात गेल्या होत्या. बाजूलाच मक्याचे शेत आहे. या मक्याच्या शेतातून आलेल्या बिबट्याने ललिताबाई यांच्यावर हल्ला करून त्यांचा बळी घेतला. ही घटना ताजी असतानाच आज (रविवारी) सरदार नगर येथील दीपमाला तडवी ही इयत्ता चौथी शिकणारी दहा वर्षीय विद्यार्थींनी तिच्या मैत्रिणीसोबत आजोबांच्या शेतात मका घ्यायला गेली होती.तिथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक झडप घालून तिला ठार केले. त्यानंतर वन अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. दोन दिवसात बिबट्याने दोघांचा जीव घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

तळोदा तालुक्यातील नववा बळी

तळोदा तालुक्यातील चिनोदा, दलेलपूर, रोझवा प्लॉट, सरदारनगर या गावांतील १० किलोमीटर परिघाच्या अंतरात आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये चिनोदा शिवारात बिबट्याने सातवर्षीय बालक व त्यानंतर काजीपूर शिवारात आजी व नातवाचा बळी घेतला होता. सप्टेंबर महिन्यात रोझवा प्लॉट येथे बालिकेवर झडप घालून बिबट्याने तिला ठार केले. डिसेंबर महिन्यात सरदारनगर शिवारात आठ वर्षीय बालक बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडला होता. जानेवारी महिन्यात बेलिपाडा शिवारातील घटनेत एकाचा मृत्यू झाला होता. तर फेब्रुवारी महिन्यात राजविहीर शिवारात ६० वर्षीय वृद्ध बिबट्याचा हल्ल्यात ठार झाला होता. शनिवार रोजी मरण पावलेल्या ललिताबाई अशोक पाडवी या आठव्या तर आज रविवार रोजी दीपमाला तडवी ही मुलगी नववी बळी ठरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT