उत्तर महाराष्ट्र

माझी वसुंधरा स्पर्धेत प्रथम आलेल्या शिरसाटे गावाची सफर

गणेश सोनवणे

नाशिक : वैभव कातकाडे

पंचतत्त्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकासासाठी सुरू केलेल्या 'माझी वसुंधरा ३.०' २०२२-२३ स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी राज्यस्तरीय बक्षीस मिळविले असून, यावर्षी इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

माझी वसुंधरा अभियान सुरू झाल्यापासून यात राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये नाशिक जिल्ह्याचा नावलौकिक राहिला आहे. त्यात शिरसाटे गावाने अधिकची भर घातली आहे. लोकसंख्या दोन ते पाच हजार गटात शिरसाठे ग्रामपंचायत राज्यात प्रथम आली आहे. या गावाला मिळालेला हा पहिलाच पुरस्कार नसून याआधीही जिल्हा परिषदेने या गावाला स्व. आर. आर. आबा सुंदर गाव पुरस्कार प्रदान केलेला आहे. आताही येथे राष्ट्रसंघाने घोषित केलेली शाश्वत विकासाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

मुंबई महामार्गापासून आठ किमी अंतरावरील या गावाची लोकसंख्या अवघी 1 हजार 280 इतकी असून, 255 कुटुंब येथे राहतात. पावसाळ्यात प्रचंड पाऊस, डोंगरावर वनराई तसेच वसुंधरेने हिरवा शालू पांघरला असल्याचे चित्र या ठिकाणी असते. मात्र, उन्हाळ्यात दगडी माळरान, प्रचंड ऊन आणि सगळीकडे कोरडाठाक परिसर असे विरोधाभासी वातावरण गावात आहे. मात्र, गेल्या तीन-चार वर्षांत या गावाने विकासाचा मुद्दा उचलून धरत विविध शासकीय योजनांचा आधार घेत त्यात नावीन्य शोधत काम केले आहे. 'गाव करी, ते राव न करी' या उक्तीप्रमाणे गावातील बरेच रावकरी फक्त नावालाच उरले होते. गावाने संकल्प केला आणि माझी वसुंधरा उपक्रमात सहभागी होत पंचमहाभुतांना अनुसरून कामाला लागले. पृथ्वी, जल, वायू, आग आणि आकाश या पंचतत्त्वांसाठी विविध उपक्रमांचे नियोजन सुरू झाले आणि काही दिवसांत उभे राहिले एक आदर्श गाव. या गावाला आतापर्यंत 800 ग्रामसेवक आणि सरपंचांनी भेट दिली आहे. गावात प्लास्टिकमुक्तीचा प्रकल्प राबविला जात आहे.

या गावात गायचराई माळरानावरील जागेवर या ग्रामपंचायतीने गावाच्या विकासासाठी अथक प्रयत्न केले आहेत. लोकसंख्येच्या निकषानुसार महाराष्ट्र रोजगार हमी योजनांतर्गत 8 हजार झाडांची फळबाग फुलविली आहे. यामध्ये 1 हजार 300 केशर आंबा, 1 हजार 700 सीताफळ, जांभूळ, साग अशा झाडांचा सहभाग आहे. ही फळबाग फुलविताना गावच्या सरपंचांपासून ग्रामसेवक, ग्रामसेवक सदस्य रोज स्वत: कामे करत फळबाग फुलवित होते. या फळबागेमुळे येत्या दोन वर्षांनंतर ग्रामपंचायतीला लाखोंचे उत्पन्न सुरू होणार आहे.

रेन हार्वेस्टिंगने गाव झाले जलयुक्त 

शिरसाटे गावाने जलसंधारणामध्ये 29 दगडी बांध बांधले असून, डोंगरावरून पाणी आल्यास माती व पाणी वाहून जाऊ नये, यासाठी 1200 मीटरच्या 4 डीप सीसीडी अर्थात चारी खोदकाम केले आहे. जेणेकरून पाणी जागेवरच झिरपेल व त्यामध्ये पाण्याचा अपव्यय न होता गावाच्या पाण्याचा स्रोत आणखी वर येईल. त्याचा फायदा गावातील विहिरी, हातपंप यांच्यावर अवलंबून असलेल्यांना होत आहे.

पावसाचे पाणी वाहून जाऊ नये, यासाठी गावातील सर्व शासकीय इमारतींवरील पाण्याला रेन हार्वेस्टिंगच्या माध्यमातून गोळा करण्यासाठीची सिस्टीम कार्यान्वित केली आहे. ही सिस्टीम राज्यातील सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये करण्याच्या सूचना काही वर्षांपूर्वीच राज्य शासनाने केल्या होत्या. मात्र, सकारात्मक प्रतिसाद किती मिळाला हा संशोधनाचा विषय असला, तरी या ग्रामपंचायतीने रेन हार्वेस्टिंगचा प्रकल्प यशस्वी केल्याचे दिसते.

त्याचप्रकारे गावात सांडपाणी व्यवस्थापनांतर्गत अभिसरण योजनेंतर्गत 1285 मीटर आरसीसी 100 टक्के भूमिगत गटार करण्यात आलेली आहे. सर्व पाणी गावाच्या दोन कोपर्‍यांत एकत्रित केले जाते व सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी स्थिरीकरण तळ्याचे कामदेखील प्रस्तावित असून, या पाण्याचा पुन्हा वापर हा वृक्षांना पाण्याची व्यवस्था करण्यासाठी होणार आहे. काही घरे ही भूमिगत गटारींना जोडलेली नाही, तिथे रोजगार हमी योजनेंतर्गत 50 ठिकाणी शोषखड्डे घेण्यात आले आहेत.

स्वच्छ गाव म्हणून मिळाली ओळख
शिरसाटे हे गाव 100 टक्के हगदारीमुक्त गाव आहे. या गावात शासकीय योजनांच्या माध्यमातून रस्ते, घरकुल योजना, स्वच्छ भारत मिशन पूर्ण करण्यात आले आहे. घनकचर्‍याचे योग्य नियोजन करण्यात आल्याने हे गाव स्वच्छ गाव म्हणूनदेखील ओळखले जात आहे. गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, गोकुळ सदगीर, उपसरपंच शीतल चंदगीर, ग्रामसेवक हनुमान दराडे, सदस्य श्यामसुंदर सोपनर, तारा तेलंग, रमेश शिद, अलका दोंदे, शंकर गांगुर्डे, कर्मचारी भास्कर सदगीर, भावराव गांगुर्डे, संपत सप्रे, दिनकर म्हसणे हे गावाची धुरा सांभाळत आहेत.

गावची स्वतंत्र वेबसाइट

शिरसाट ग्रामपंचायत पारदर्शकपणे कारभार करीत आहे. याचेच उदाहरण म्हणजे या गावची स्वतंत्र वेबसाइट होय. विविध योजना तसेच गावातील विकासासाठीची सर्व माहिती या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच गावाचा लेखाजोखा दैनंदिन टाकण्यात येतो. गावात फुलपाखरू पार्क उभारले आहे. ग्रामपंचायत कार्यालयाला कंपाउंड केले आहे. त्या कंपाउंडला फुलपाखरू पार्क नाव देण्यात आले आहे.

कचर्‍यावर प्रक्रिया

घनकचरा व्यवस्थापनांतर्गत 100 टक्के कचरा संकलन, 100 टक्के विलगीकरण व 100 टक्के ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत एकूण 15 ठिकाणी ओला-सुका कचरा वेगळा व प्लास्टिक कचरा वेगळा टाकण्यासाठी कचराकुंडी लावण्यात आलेली असून, सायकलचलित घंटागाडीद्वारे कचराकुंडीतील कचरा एका ठिकाणी संकलित करण्यात येतो. कचरा विगतवारी मशीनद्वारे वेगवेगळा कचरा केला जातो.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT