नाशिकरोड; पुढारी वृत्तसेवा : पाच जणांचा खून व तीन जणांना गंभीर जखमी करून तीन वर्षापासून पसार असलेल्या संशयित आरोपीला नाशिक रोड पोलिसांनी अटक केली. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे सन 2019 मध्ये ही घटना घडली होती. हे प्रकरण सीआयडीकडे देखील सोपवण्यात आले होते.
अरबाज अजगर खान उर्फ गोलु खान असे संशयीत आरोपीचे नाव आहे. नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. भुसावळ पोलीस ठाणे हद्दीतील समता नगर येथील जळगाव आरपीआय (आठवले गट) जिल्हाध्यक्ष, तसेच भुसावळ नगर परिषदेतील भाजपाचे नगर सेवक रवींद्र बाबुराव खरात उर्फ हम्प्या दादा (रा.भुसावल, जि.जळगाव) व त्याचे घरातील इतर ४ सदस्य असे एकुण ५ इसमाचा रिव्हॉलव्हरने फायर करून खुन केला होता. तसेच इतर तीन जणांना गंभीर जखमी करून हत्याकांड घडवुन आणले होते.
सदरचे हत्याकांड घडवुन आणल्यापासुन गुन्हातील संशयीत आरोपी अरबाज अजगर खान उर्फ गोलु खान हा फरारी होता. हे प्रकरण विधानसभेमध्ये उपस्थित झाले होते. संपुर्ण महाराष्ट्रभर प्रकरण खुप गाजले होते. हा गुन्हा तपासासाठी सीआयडीकडे वर्ग केला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासुन तीन वर्षाचा कालावधी उलटुनही संशयित अरबाज अजगर खान उर्फ गोलु खान हा पोलिसांना गुंगारा देत होता. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
नाशिकरोड पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संशयीत आरोपी अरबाज अजगर खान उर्फ गोलु खान याला पोलिसांनी मोठया शिताफीने जेलरोड परिसरातून अटक केली.