नांदूरशिंगोटे : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
शिवारात चासखिंडीत शुक्रवारी (दि.23) सकाळी 10 च्या सुमारास 65 वर्षीय वृद्धाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. भाऊसाहेब रामनाथ आहेर (65, रा. लोणी खुर्द, ता. राहाता, जि. अहमदनगर) असे मृताचे नाव आहे.
चास खिंडीत रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मंदिरापासून 100 फूट अंतरावर वनविभागाच्या जागेत निर्जनस्थळी हा मृतदेह पडलेला होता. गायी चारणार्या गुराख्याने हा प्रकार गावातील नागरिकांना सांगितल्यानंतर नांदूरशिंगोटे दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक आर. टी. तांदळकर यांना सरपंच गोपाळ शेळके यांनी दिलेल्या माहितीनंतर वावीचे सहायक पोलिस निरीक्षक सागर कोते, उपनिरीक्षक तांदळकर, सोनवणे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी मृतदेहाच्या खिशात 7/12 उतारा तसेच मृतदेहाजवळ लिंबू, अगरबत्ती, पेट्रोलची बाटली, 10 फूट अंतरावर रक्ताने माखलेला दगड आढळून आला. 7/12 उतार्यावर भाऊसाहेब आहेर यांच्या नावाची नोंद होती. मृतदेहाजवळ पडलेल्या फोनवरून नातलगांशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलावून मृतदेहाची ओळख पटविली.
मृत भाऊसाहेब आहेर यांचा भाऊ कैलास रामनाथ आहेर (50, धंदा-शेती रा. लोणी खु. नळेगाव रोड, शिंदे वस्ती, ता. राहता, जि. अहमदनगर) यांनी वावी पोलिसांत फिर्याद दिली. मुलगा एकनाथला दारूचे व्यसन असल्यानेे त्याची दारू सोडण्यासाठी भाऊसाहेब आहेर नेहमी एका बाबाकडे जात येत होते.
गुरुवारी (दि.22) सायंकाळी 4 च्या सुमारास भाऊसाहेब आहेर हे घरातून कोणास काहीएक न सांगता निघून गेले होते. याबाबत वावी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांनीही घटनास्थळी भेट देत पोलिसांना तपासाकामी सूचना केल्या.