जळगाव : जळगाव शहरातील रस्ते, गाळेधारकांचा करार नुतनीकरण, घनकचरा प्रकल्प यासह शेतकऱ्यांच्या विषयावरून आमदार राजुमामा भोळे यांनी आक्रमक भूमिका घेतली. याविषयावर त्यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली.
जळगाव शहरातील महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या गाळ्यांचे महानगरपालिकेने गाळे धारकांना बजावलेले दंडात्मक बिले व मालमत्तावरील बोजा लावण्याच्या घोषणेमुळे महानगरपालिका प्रधासानाविरोधात गाळेधारक आक्रमक झाले आहे. ७ वर्षांचे थकीत भाडे गाळेधारकांनी काही प्रमाणात बिलाचे धनादेश जमा करून सुद्धा गाळे धारकांना अनधिकृत करण्याचे ठरविले आहे. त्यावर निर्णय घेऊन गाळेधारकांचे थकीत भाडे, भाडे पट्टे यांचे नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी आमदार भोळे यांनी केली आहे.
घनकचरा प्रकल्प सुरू करा
जळगाव शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग तसेच रस्त्यांवर पाडलेला कचरा हा उचलला जात नाही. तो लवकरात लवकर कचरा भरून घेऊन घनकचरा प्रकल्प अजून पर्यंत बंद आहे, तरी घनकचरा प्रकल्प त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे.
एमआयडीसी मधील समस्या सोडवा
जळगाव शहरातील एमआयडीसी मधील अनेक समस्यांवर त्वरित निर्णय घेण्यात यावा. स्मार्ट मॅग्नेट योजनेंतर्गत प्रकल्प मंजूर करतांना जळगाव जिल्ह्याला प्राधान्य देण्यात यावे. जळगाव शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागातील नागरिकांकडून रस्त्यांवर वारंवार तक्रारी प्राप्त होत असून त्यावर शासनाने लक्ष घालून लवकरात लवकर रस्ते व्हावेत.
समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवा
मागील सरकारच्या ३३ महिन्यांच्या कार्यकाळात विदर्भ, मराठवाड्यासह, उत्तर महाराष्ट्रातील भागातील अनेक विकास प्रकल्पांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे १८७ टीएमसी पाणी अडविण्यात यावे. खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात पाणी वळविल्याने खान्देशातील जिल्हे सुजलाम, सुफलाम होईल, अशी मागणी आमदार भोळे यांनी केली.
शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित
जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी होऊनही अजून पर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळाली नसून ती लवकरात लवकर मिळावी. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विजेचा प्रश्न उद्भवत असून शेतकऱ्यांना दिवसा विजेचा पुरवठा करण्यात यावा. जिल्ह्यात बळीराजा जलसंजीवनी प्रकल्प व्हावा तसेच जिल्ह्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेला चालना मिळण्यासाठी संबंधित विभागास आदेश द्यावेत. जळगाव जिल्ह्यात कापसाच्या पिकाचे उत्पादन सर्वात जास्त होत असून कापसावर प्रक्रिया उद्योगला गती देण्यासाठी नवीन वस्त्रोद्योग धोरण अंमलात आणण्यात यावे असेही राजुमामा भोळे यांनी सांगितले.