उत्तर महाराष्ट्र

सोशल प्लॅटफॉर्ममधून वाढले मानसिक आजार!

Arun Patil

नाशिक, दीपिका वाघ : कोणत्याही व्यावसायिकाला ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल प्लॅटफॉर्मचा आधार घ्यावाच लागतो. ग्राहक जेवढ्या प्रमाणात सोशल प्लॅटफॉर्मचा वापर करतात तेवढा नफा व्यावसायिकांना अधिक, असे गणित आहे. आताच्या घडीला जेवढे सोशल प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत त्याच्या दुपटीने मानसिक आजारपण वाढले आहेत. खासकरून 10 ते 35 वयोगट गेल्या दहा वर्षांत स्क्रीन टाईमचा बळी ठरला आहे. त्यासाठी काही केस स्टडी बघू…

* 21 वर्षांचा मुलगा नामांकित कंपनीत कायमस्वरूपी नोकरीला, पण अ‍ॅानलाईन लॉटरीमध्ये पैसा मिळत गेल्याने नोकरीपेक्षा जास्त लॉटरीवर विश्वास बसला आणि चांगली नोकरी सोडली. लॉटरीपायी 25 लाख रुपयांची उधारी करून घेतली. हे त्यालाही लक्षात आले नाही. मध्यमवर्गीय कुटुंब असल्याने घरच्यांसाठी मोठा शॉक होता.

* 34 वर्षीय मुलगा त्याला अ‍ॅानलाईन शॉपिंगचे व्यसन जडले. रोज काही ना काही खरेदी करून 50 बुटांचे जोड त्याने जमा केले. ते बॉक्स कधी उघडून बघितले नाही. घरातली एक खोली पूर्ण सामानाने भरली होती. त्याच्या या सवयीमुळे घरचे हतबल झाले.

* एमबीबीएस शिकणारी विद्यार्थिनी व मलेशियात राहणारा मुलगा. दोघेही डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते. प्रेमात आकंठ बुडालेले असताना सात महिन्यांनंतर मुलाने अचानक कोणतेही कारण न सांगता मुलीला ब्लॉक केले आणि विषय संपला. मुलीचा कोंडमारा होऊन ती डिप्रेशनमध्ये गेली.

* सतत वेबसीरिज मुव्हीज बघण्याचे व्यसन लागलेला 19 वर्षीय मुलगा व्यसनमुक्ती केंद्रात दाखल आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मची स्पर्धा माणसाच्या झोपेची आहे. नॅशनल -इंटरनॅशनल सीरिज बॅक टू बॅक बघण्याच्या सवयीमुळे त्याचे व्यसनात रूपांतर झाले.

*  मानसोपचार तज्ज्ञांकडे येणार्‍या या रोजच्या केसेस झाल्या आहेत. डिस्टन्स रिलेशनशिप तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. मानसिकद़ृष्ट्या डिस्टर्ब झालेल्या तरुणांसाठी अशी रिलेशनशिप आधार असते. त्यामुळे ते व्हर्च्युअल रिलेशनशिपवर अवलंबून असतात. 99 टक्के डिस्टन्स रिलेशनशिप फसव्या असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

मानसिक आजार घालवता येतो…

एखाद्या गोष्टीचे व्यसन जडले आहे त्याची जाणीव सर्वात आधी रुग्णाला होणे गरजेचे असते. व्यसन जडण्याची ती पहिली पायरी असते. त्यानंतर रुग्णाचे, गरज पडल्यास कुटुंबाचे समुपदेशन, औषधोपचार करून दैनंदिन आयुष्य जगता येते, पण रुग्णाने व्यसन जडल्याचे मान्यच केले नाही. केवळ घरच्यांमुळे तो मानसोपचार तज्ज्ञाकडे गेला तर सुधारणा होणे अवघड असते. त्यामुळे पालक आणि मुलांनी एकमेकांकडे लक्ष देणे गरजेचे असते. आजाराचे निदान जेवढ्या लवकर तेवढे उपचार करणे सुलभ होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT