जळगाव | शहरातील जुना खेडी रोड परिसरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरी करणाऱ्या संशयित आरोपीला जळगाव पोलिसांनी असोदा गावातून (दि. २३) रोजी अटक केली आहे. एमआयडीसी मधील एका कंपनीत काम करून हा चोरीचा व्यवसाय करीत होता. त्याच्याकडून तिन्ही गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
शनिपेठ व एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या घटना रोखण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व डीवायएसपी संदीप गावित यांनी सूचना दिल्या होत्या. चोरट्याचा मागवा लागत नसल्याने पोलिसांनी वेगवेगळ्या घटनांच्या सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारावर तपास सुरू करण्यात आला. अखेर शनिपेठ पोलिसांनी संशयित आरोपी गणेश राजेंद्र माळी (वय २९, रा. आसोदा, ता. जि. जळगाव) याला आसोदा गावातून अटक केली आहे.त्याने तीन गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याच्याकडून २३ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे.
तो जळगाव एमआयडीसीतील ए.के. स्विच कंपनीत रोजंदारीवर काम करतो. शनिवार आणि रविवार कंपनीला सुट्टी असताना तो हे गुन्हे करत असे. यासाठी तो स्वतःची हिरो होंडा पॅशन मोटरसायकल वापरत होता, असे त्याने सांगितले. त्याने शनिपेठ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दोन आणि एमआयडीसी पोलीस ठाणे येथे एक असे एकूण तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.