जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात ‘वेध प्रेरक कार्यशाळा 2025’चे आयोजन करण्यात आले Pudhari News Network
जळगाव

Zilla Parishad Jalgaon | ‘वेध प्रेरक कार्यशाळा 2025’; 100 टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट

जळगाव : विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल गोडी, आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे – मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होण्यासाठी विविध उपक्रम राबविणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे ही काळाची गरज आहे. शिक्षकांनी त्या दिशेने समर्पितपणे कार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले.

‘वेध प्रेरक कार्यशाळा 2025’चे आयोजन जिल्हा प्रशिक्षण संस्था, शिक्षण विभाग प्राथमिक यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार (दि.19) रोजी जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल बोलत होत्या. व्यासपीठावर राज्य वेध प्रेरक निलेश घुगे, शिक्षण अधिकारी विकास पाटील, डीईटी संस्थेचे साळुंखे, उपशिक्षणाधिकारी चौधरी, सरोदे आणि अन्य मान्यवर अधिकारी उपस्थित होते.

करनवाल म्हणाल्या की, "या अभियानातून जिल्ह्यात 100 टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून शैक्षणिक गुणवत्ता प्रत्यक्ष दिसली पाहिजे. त्यासाठी जिल्हा परिषद स्वतंत्र डेटा तयार करणार आहेत. शिक्षकांनी आपल्या वर्गातील किती विद्यार्थी वाचन करू शकतात याचा विचार करणे गरजेचे आहे."

"शिक्षण हे समाजमनावर दूरगामी परिणाम करणारे माध्यम आहे. त्यामुळे ‘विद्यार्थी ही आमची जबाबदारी’ असल्याची भावना शिक्षकांमध्ये रुजणे गरजेचे आहे. शिक्षण म्हणजे फक्त पाठांतर नव्हे, तर विद्यार्थ्यांना समाजात वावरताना व्यवहारात उभे राहण्यास मदत करणारे असले पाहिजे. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नवकल्पनाशील उपक्रम राबविण्याची जबाबदारी शिक्षकांनी स्वतः घेणे आवश्यक आहे." यासोबतच गुणवत्तापूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षक, केंद्रप्रमुख यांना प्रेरणा देण्यासाठी ‘शिक्षण कप’ देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

राज्य वेध प्रेरक निलेश घुगे यांनी शिक्षकांशी मनमोकळ्या संवादात त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. ते म्हणाले, गुणवत्ता वाढीच्या महत्त्वपूर्ण कामात सहभागी होण्याची संधी या कार्यशाळेमुळे मिळाली आहे. यामधून प्रेरक शिक्षकांची दखल घेतली जाणार असल्याने प्रत्येक शिक्षकांमध्ये सतत शिकण्याची तयारी ठेवायला हवी. शिक्षण अधिकारी विकास पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळेत जिल्हाभरातील 164 शिक्षक, केंद्रप्रमुख आणि गटविकास अधिकारी यांनी सहभाग नोंदवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT