जळगाव : यावल तालुक्यातील हिंगोणा येथे एका अल्पवयीन मुलीशी मैत्री करण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान रक्तरंजित घटनेत झाले आहे. शनिवारी झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यात १९ वर्षीय प्रथमेश मुकेश महाले या तरुणाचा मृत्यू झाला असून, अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या हत्याकांडातील संशयित आरोपींमध्ये मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोणा गावातील एका अल्पवयीन मुलाने गावातीलच एका मुलीला मैत्री करण्याबाबत विचारले होते. यावरून गेल्या आठवड्यात वाद झाला होता. हा वाद मिटला असतानाच, शनिवारी पुन्हा जुन्या वादाची ठिणगी पडली. मंगलाबाई तायडे यांनी निखिल गजरे याला उद्देशून "तुझ्यामुळे माझा भाचा गाव सोडून गेला" असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी निखिलने त्यांना वाद न घालण्यास सांगितले. मात्र, वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि सात ते आठ जणांच्या जमावाने प्रथमेश महाले, मोहित गजरे, रीना गजरे आणि निखिल गजरे यांच्यावर लाठ्या-काठ्या आणि चाकूने हल्ला चढवला.
या हल्ल्यात मुंबई पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत असलेला मनोज सुधीर तायडे याने आणि एका अल्पवयीन मुलाने चाकूने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात प्रथमेश महाले याला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर इतर तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी रीना मोहित गजरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींमध्ये मनोज सुधीर तायडे (मुंबई पोलीस कर्मचारी), सुधीर रमेश तायडे, सचिन सुधीर तायडे, आरती सचिन तायडे, मंगलाबाई सुधीर तायडे, निखिल संजय तायडे आणि एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. फैजपूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, संशयितांची धरपकड सुरू आहे. शांत असलेल्या हिंगोणा गावात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.