जळगाव: शहरातील महाबळ परिसरात राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणीवर अत्याचार करून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी पीडितेचे आक्षेपार्ह फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करून तिची बदनामी केल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी चौघांविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१४ सप्टेंबर रोजी संशयित आरोपी गणेश साहेबराव पाटील याने पीडित तरुणीला बोलण्यात गुंतवून तिच्यावर अत्याचार केला. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ काढून, त्याने तरुणीला सातत्याने धमकावले आणि पुन्हा पुन्हा अत्याचार केला. नंतर, गणेश पाटील याने पीडितेला पळवून नेले आणि तिचे आक्षेपार्ह फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केले. या कृत्यात गणेशचे मित्र विजय, विकास आणि मनोज (पूर्ण नाव उपलब्ध नाही) यांनी त्याला सहकार्य केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने धाडस दाखवत रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, गणेश साहेबराव पाटील, विजय, विकास आणि मनोज यांच्या विरोधात बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय शेलार करत आहेत.