जळगाव : "भारताच्या भूमीवर अतिरेक्यांना पाय ठेवू देणार नाही" अशा घोषणा करणाऱ्यांचे आता काहीच दिसत नाही, "घुस घुस के मारेंगे" म्हणणारे नेते कुठे गेले? असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर केला आहे.
जळगाव येथे माध्यमांशी बोलताना देसाई म्हणाले की, "पहेलगाम येथे घडलेली अतिरेकी घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या हल्ल्याचे स्वरूप वेगळे असून, या ठिकाणी नाव व आडनाव विचारून गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामुळे हिंदू खतरे में आहेत असे म्हटले, तरी ते चूक ठरणार नाही."
देसाई म्हणाले की, "2015 मध्ये गड शत्रिंगला झालेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी असा दावा केला होता की, 'हा अतिरेक्यांचा शेवटचा हल्ला असेल'. मात्र प्रत्यक्षात अतिरेकी सतत संधी शोधत असतात. केंद्र सरकारने गेल्या 11-12 वर्षांत काय तयारी केली? अतिरेक्यांना रोखण्यासाठी कोणते पावले उचलली? याची कोणतीही अद्याप तरी स्पष्टता नाही."
देसाई यांनी सरकारवर जबाबदारी टाकत विचारले की, "56 इंची छाती असल्याचे सांगणाऱ्यांना आता उत्तर द्यावे लागेल. एवढ्या वर्षांची सत्ता असूनही हे हल्ले थांबत नाहीत, यास जबाबदार कोण?" "हिंदुत्वाचा अभिमान बाळगणारे आणि त्याचाच मंत्र जपून सत्तेत आलेले भाजप नेते आता देशासमोर स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल. या अपयशाबद्दल देशाची माफी मागावी," अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.