Gulabrao Patil : बंडखोरी झाली तरी महायुतीचाच धर्म पाळणार; जिल्हा बँकेच्या सर्वच जागा जिंकू  file photo
जळगाव

Gulabrao Patil : बंडखोरी झाली तरी महायुतीचाच धर्म पाळणार; जिल्हा बँकेच्या सर्वच जागा जिंकू

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी १२ जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित ९ जागांसाठी आज चुरशीने मतदान पार पडले.

पुढारी वृत्तसेवा

We will win all the seats in the District Bank: Guardian Minister Gulabrao Patil

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी १२ जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित ९ जागांसाठी आज चुरशीने मतदान पार पडले. या निवडणुकीत काही ठिकाणी महायुतीतील घटक पक्षांमध्येच बंडखोरी आणि अंतर्गत नाराजी पाहायला मिळत असली, तरी आम्ही ‘महायुतीचा धर्म’ पाळला असून सर्वच्या सर्व जागा महायुतीचेच अधिकृत उमेदवार जिंकतील, असा ठाम विश्वास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्थानिक बंडखोरीपासून ते राज्याच्या राजकारणापर्यंत विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केले.जिल्ह्यामध्ये 3036 मतदार होणार असून त्यापैकी जळगाव येथे सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदान केंद्र क्रमांक एकवर 5 मतदान केंद्र क्रमांक दोन वर 28 असे मतदान झाले होते.

बंडखोरी आणि युतीधर्मावर स्पष्टीकरण

चाळीसगावसह काही मतदारसंघांत शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांच्या मागे पक्षाचे पदाधिकारी सक्रिय असल्याच्या प्रश्नावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, "काही लोकांनी बंडखोरी केली हे आता साऱ्या जगाला उघड झाले आहे. जागावाटपावरून काहीशी नाराजी होती, हे नाकारता येत नाही; परंतु नाराजी होती याचा अर्थ असा होत नाही की आम्ही महायुतीच्या बाहेरच्या उमेदवाराला मतदान करू. असे अजिबात होऊ शकत नाही. आम्ही शेवटपर्यंत महायुतीचा धर्म पाळलेला आहे." भाजपमधील अंतर्गत आव्हान आणि नेत्यांची पणाला लागलेली प्रतिष्ठा यावर बोलताना, काही ठिकाणी दोन उमेदवार रिंगणात असले तरी अंतिमतः महायुतीचेच अधिकृत उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका

लाडकी बहीण योजना (२१०० रुपये) : लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याच्या मुद्द्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या विधानाचे समर्थन करत पाटील म्हणाले की, हा महायुतीचा सामूहिक निर्णय आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर कॅबिनेट बैठकीत यावर अधिकृत शिक्कामोर्तब होऊन हा शब्द नक्की पाळला जाईल.

मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा : एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची इच्छा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना असण्यात काहीही गैर नाही; मात्र यासंदर्भातील अंतिम निर्णय महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवरच घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत आणि शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल

यावेळी गुलाबराव पाटील यांनी विरोधकांचाही चांगलाच समाचार घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करणाऱ्या खासदार संजय राऊत यांचा ‘मागच्या दरवाजाने आलेला माणूस’ असा उल्लेख करत ते म्हणाले की, केवळ प्रसिद्धीसाठी राऊत वाचाळ बडबड करतात. जर ते राजकारण सोडण्याची भाषा करत असतील, तर त्यांनी जरूर राजकारण सोडावे. तसेच, डिलिमिटेशनच्या (मतदारसंघ पुनर्रचना) मुद्द्यावरून शरद पवार यांच्या भूमिकेवर टोला लगावत त्यांनी २०१९ मधील महाविकास आघाडीच्या प्रयोगाचीही आठवण करून दिली. दुसरीकडे, इंडिया आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठींबाबत विचारले असता, प्रत्येक नेता देशहिताचा विचार करूनच निर्णय घेईल, अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT