जळगाव : महायुतीमधील तणावाबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. पैसे वाटपाच्या आरोपांवर विचारले असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. “मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. याबद्दल नंतर बोलेन. ते खोटं बोलत आहेत,” एवढे सांगून ते थेट वाहनात बसत निघून गेले. त्यामुळे महायुतीत काहीतरी चालू असल्याचे संकेत मिळाले.
चव्हाण हे चाळीसगावमध्ये भाजपाच्या प्रचारासाठी आले होते. तेथेही पैसे वाटपाच्या प्रश्नांना त्यांनी बगल दिली. दुसरीकडे, सभेत बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारच्या विविध योजनांची माहिती देत विरोधकांवर टीका केली.
चाळीसगावला आलेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रचार सभेला आले असता त्यांनी माध्यमांशी न बोलता थेट गाडीमध्ये बसले त्यांना पैसे वाटपाच्या प्रश्नावर बगल दिली.
काय म्हणाले रविंद्र चव्हाण?
"मला २ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे. त्यानंतर मी निलेश राणेंना उत्तर देईन. आत्ता मी काहीही बोलणार नाही. नंतर उत्तर देईन. निलेश राणे जे बोलत आहेत ते खोटं आहे." अशी प्रतिक्रिया रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. शिवसेना आमदार निलेश राणे यांनी रविंद्र चव्हाण हे भाजपा कार्यकर्त्याच्या घरी आले होते आणि त्यांनी पैसे दिले असा आरोप केला आहे. त्यांनी स्टिंग ऑपरेशन करत भाजपा कार्यकर्त्याच्या घरी पैशांची थप्पी असलेली पिशवी आहे असं समोर आणलं होतं. याबाबत विचारलं असता रविंद्र चव्हाण यांनी २ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे असं म्हणत उत्तर दिलं आहे. ज्यावर आता शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया समोर आली आहे.
इतकी काळजी करणारे सरकार यापूर्वी कधी नव्हते
महाजन म्हणाले की, आमच्या सरकारने भगिनी, मुली, युवक आणि कामगारांसाठी महत्त्वाच्या योजना आणल्या. कामगारांसाठी बूट, मोजे आणि घरी परतल्यावर आराम करता यावा म्हणून मच्छरदाणी दिली. इतकी काळजी करणारे सरकार यापूर्वी कधी नव्हते.
महाजन म्हणाले की, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ‘लखपती दीदी’ योजना सुरू केली. पूर्वी महिलांचा निव्वळ स्वयंपाकघरापर्यंतच प्रवास होता. आज त्या घराबाहेर पडून सर्व कामे आत्मविश्वासाने करत आहेत. महिला बचत गटांना गेल्या वर्षी 18 हजार कोटी रुपये कर्ज देण्यात आले आणि महिला कर्जफेडीत 100 टक्के प्रामाणिकपणा राखतात, अशी माहिती त्यांनी दिली.
महाजन यांनी काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले की, गरीबी हटावचे नारे दिले पण गरीबी कधी हटवली नाही. त्याउलट सर्वांचा विचार करणारे सरकार आज सत्तेत आहे. आमच्याकडे जगमान्य नेता आहे.
सभा संपताना त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना सांगितले की, सगळे वाद विसरा. आम्ही मित्र पक्षात आहोत आणि युती टिकवणार आहोत. विकासाची जबाबदारी आमची आहे. आमचा उमेदवार इतका सक्षम आहे की तो अपक्ष म्हणूनही जिंकू शकतो. कोणत्याही अमिषाला बळी पडू नका. चव्हाण यांनी माध्यमांशी औपचारिक संवाद न साधता केलेले थोडक्यात वक्तव्य आणि त्यांची टाळाटाळ यामुळे महायुतीतील घडामोडींवर नवे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.