जळगाव : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार चार महिन्यांनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकांची पार्श्वभूमी लक्षात घेता, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत हे जळगाव जिल्ह्याचा दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी पक्षाची रणनीती आणि संघटनात्मक तयारी याबाबत आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार मनोज जामसुतकर, राज्य संघटक साळुंखे, संजय सावंत, शरद तायडे, कुलभूषण पाटील, गुलाबराव वाघ, दिलीप चौधरी आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांना भाजपमधून शिवसेनेत आलेले माजी खासदार उमेश पाटील आणि करण पवार हे सोबत दिसत नसल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी, “ते आमच्यासोबतच आहेत, कदाचित मागच्या गाडीत असावेत,” असे उत्तर दिले. मात्र पत्रकार परिषद संपेपर्यंत हे दोघेही नेते त्या ठिकाणी प्रत्यक्षात हजर नव्हते.
त्यानंतर संजय राऊत म्हणाले, “करण पवार यांच्यावर जळगाव लोकसभेची जबाबदारी सोपवली आहे. तसेच लवकरच माजी खासदार उमेश पाटील यांनाही महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल.” मात्र, त्या जबाबदारीबाबत कोणताही अधिकृत खुलासा त्यांनी केला नाही. या संदर्भात कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात संभ्रम आणि चर्चा सुरू असून, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या दौऱ्यात प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली.