बापाचे प्राण वाचवायला निघाला, पण वाटेतच काळाने घाला घातला!  File Photo
जळगाव

Jalgaon Accident | बापाचे प्राण वाचवायला निघाला, पण वाटेतच काळाने घाला घातला! ट्रॅक्टरच्या धडकेत बाप-लेकाचा दुर्दैवी अंत!

चोपड्याच्या घार्डी फाटा परिसरात काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; लासुर गावातील ठोके कुटुंबावर दुःखाचा डोंगर; भरधाव ट्रॅक्टर आदळला दुचाकीवर

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : आजारी वडिलांना डोळ्यादेखत वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या एका मुलाचा आणि त्याच्या वृद्ध वडिलांचा वाटेतच अपघातात अंत झाल्याची सुन्न करणारी घटना शुक्रवारी चोपडा तालुक्यातील घार्डी फाटा येथे घडली. भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या भीषण धडकेत मोहम्मद लुकमान ठोके (वय ४२) आणि त्यांचे वडील लुकमान मुसेखा ठोके (वय ७४) या बाप-लेकाची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे संपूर्ण लासुर गावावर शोककळा पसरली असून, ग्रामीण भागातील जीवघेण्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दवाखान्यात जात असतानाच अपघात!

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील लासुर येथील मोहम्मद लुकमान ठोके हे आपले वडील लुकमान मुसेखा ठोके यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी दुचाकीने जळगावला घेऊन जात होते. "लवकरात लवकर उपचार मिळाल्यास वडील बरे होतील" या आशेने मोहम्मद दुचाकी चालवत होते. मात्र, घार्डी फाटा परिसरात समोरून येणाऱ्या एका भरधाव ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

दुचाकीचा चक्काचूर, घटनास्थळी रक्ताचा सडा

धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. या भीषण आघातात मोहम्मद लुकमान ठोके यांचा जागीच मृत्यू झाला. डोळ्यासमोर मुलाचा अंत होताना पाहण्याचे दुर्दैव जखमी वडिलांच्या नशिबी आले. गंभीर जखमी झालेल्या लुकमान मुसेखा ठोके यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, मृत्यूशी झुंज देत असताना काही तासांतच त्यांचीही प्राणज्योत मालवली. एकाच अपघातात घरातील दोन आधारवड कोसळल्याने ठोके कुटुंबाचा आक्रोश पाहून उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.

जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी

घटनेची माहिती मिळताच लासुर येथील ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी जळगाव जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली. नगरसेवक इबा पटेल यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेऊन पीडित कुटुंबाला धीर दिला. मृतदेहांचे शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

ट्रॅक्टरचालकांच्या मुजोरपणावर कोणाचे नियंत्रण?

चोपडा परिसरातून धावणाऱ्या वाळू आणि इतर साहित्य वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरचा वेग अनेकदा नियंत्रणाबाहेर असतो. या भीषण अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर कठोर कारवाई करून परिसरात वाहतुकीला शिस्त लावण्याची मागणी आता जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT