जळगाव : "विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये यश मिळाले नाही असे म्हणणारे लोक राजकारणात कच्चे आहेत," असा टोला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पालकमंत्र्यांना नाव न घेता लगावला. जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, ते माध्यमांशी संवाद साधत होते.
“भाजपा २४ तास निवडणुकीच्या मूडमध्ये आहेत”, असे सांगत राऊतांनी भाजपावरही टीका केली. "निवडणुका येतात आणि जातात, पण संघटनेच्या माध्यमातून काम करणे आणि राज्याची सेवा करणे, हेच आमच्या संघटनेचे खरे ध्येय आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
राऊत म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार येत्या चार महिन्यांत महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी शिवसेनेने राज्यभर तयारी सुरू केली आहे. “पारंपरिक निवडणुकीत झालेल्या विजयांचा आधार घेऊन पुढच्या निवडणुकीचा अंदाज बांधणे म्हणजे राजकारणातील अपरिपक्वता आहे. आमची संघटना मजबूत आहे आणि आम्ही ही निवडणूक ताकदीने लढवणार,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
भाजपवर निशाणा साधताना राऊत म्हणाले, "विधानसभेतील काही विजय हे लोकशाही मार्गाने झालेले नाहीत. मताधिक्य मिळवले असले तरी लोकांचा विश्वास त्या विजयांवर नाही. भाजपचे नेते स्वतःही त्या निकालांवर विश्वास ठेवत नाहीत." "पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशात काय सुरू आहे हे समजत नाही. ते फक्त रोड शो करत फिरतात. मात्र, शिवसेना कधीच अशा गोष्टी करत नाही. लोकांचे प्रश्न आम्हाला अधिक महत्त्वाचे वाटतात."
पालकमंत्र्यांवरही अप्रत्यक्ष टीका करत राऊत म्हणाले, “जळगावमध्ये लोकांना उपचार मिळत नाहीत, रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नाहीत. मंत्री फक्त पद मिरवतात, पण जनतेचे प्रश्न दुर्लक्षित केले जातात. लाडक्या बहिणींचे रस्त्यावर हाल होत आहेत आणि त्यांची प्रसिद्धी केली जाते, हे लाजीरवाणे आहे.”
शिंदे गटावर टीका करताना राऊत म्हणाले, "शिवसेना ही मराठी माणसाच्या कल्याणासाठी आहे. लाडकी बहीण, मावस बहीण या प्रकार शिवसेनेच्या विचारसरणीत कधीच नव्हते. जे लोक बाळासाहेब ठाकरे यांचे वारस असल्याचे म्हणतात, त्यांचे विचार आज भाजपाच्या नेत्यांशी मिळतेजुळते आहेत. यांचे खरे पक्षनेते अमित शहा आहेत," असा गंभीर आरोप त्यांनी केला.
“ही रक्कम अंदाज समितीच्या अध्यक्षांना खूश ठेवण्यासाठी आणण्यात आली होती. या समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर हे शिंदे गटाचे नेते आहेत. त्यांच्याविरोधात सीबीआय व ईडीची कारवाई सुरू झाल्यानंतर ते पळून गेले. जर दुसऱ्या कोणाकडे अशी रोकड सापडली असती, तर सीबीआय, आयकर खात्याने तत्काळ कारवाई केली असती. पण येथे काहीच घडले नाही,” अशी टीका त्यांनी केली.
"फडणवीस म्हणाले होते की, भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात टाकू. पण कोणावर गुन्हा दाखल झाला? स्थापन केलेल्या एसआयटीचे नेतृत्व कोणाकडे आहे? सदस्य कोण आहेत? याची माहिती दिली का? लोकांना फसवण्याचे काम बंद करा," असा सल्लाही त्यांनी दिला.