जळगाव : आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना थेट आव्हान देत भाजपचे नेते व माजी मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी रोखठोक भाष्य केले आहे. "आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत, आता तुम्हीही तयार व्हा आणि तुमचा जनाधार रिझल्टमधून दाखवा," असे त्यांनी जामनेर येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
महाजन म्हणाले की, “ज्यांच्या तालुक्यात त्यांची ग्रामपंचायतदेखील राहिलेली नाही, त्यांनी इतरांवर टीका करणे थांबवावे. फक्त वल्गना न करता आता निवडणुका तोंडावर आहेत, जनतेत किती पाठिंबा आहे ते दाखवा. हे आव्हान केवळ एका नेत्याला नव्हे, तर सर्वच विरोधकांना आहे.”
एकनाथ खडसेंवर बोलताना महाजन म्हणाले, “खडसेंबद्दल आता काहीही बोलण्यासारखे शिल्लक राहिलेले नाही. त्यांच्या गावातील ग्रामपंचायतदेखील त्यांच्याकडे राहिलेली नाही. मग ते इतरांना मुक्ती का देतात?”
'ऑपरेशन सुंदर' प्रकरणावर भाष्य करताना महाजन म्हणाले की, “हे केवळ कागदांपुरते प्रकरण नव्हते. देश आणि संपूर्ण जगाने आपल्या सैनिकांचे शौर्य पाहिले आहे. काहीजण प्रसिद्धीसाठी पत्र लिहितात, पण त्यांना प्रत्यक्ष काय घडले ते समजत नाही.”
पीएसआय पोटे यांच्या निलंबनावर बोलताना महाजन म्हणाले कर, “कारवाई झालेली आहे. कुणाचाही हस्तक्षेप नसताना ही कारवाई पार पडली आहे. त्यामुळे प्रसिद्धीसाठी कोणतीही अनधिकृत माहिती पसरवू नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.”