जळगाव: राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला असलेल्या जामनेर शहरात चोरट्यांनी पोलिसांना उघड आव्हान दिले आहे. शहरातील आनंद नगर परिसरात एका बंद घराचा कडी-कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १ लाख ६८ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत. या धाडसी घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दरबार नवलसिंग राठोड (३७, रा. शिक्षक कॉलनी, मूळ रा. मांडवा बु।।) हे आनंद नगरमधील एका भाड्याच्या घरात राहतात. दि. ३ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ते घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत निर्ढावलेल्या चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कोंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील गोदरेज कपाटाचे आणि आतील कप्प्याचे लॉक तोडून लबाडीच्या इराद्याने दागिन्यांची चोरी केली. ७ मार्च रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.चोरट्यांनी कपाटातील
सोन्याच्या अंगठ्या ४ तोळे वजनाच्या ७ अंगठ्या किंमत १ लाख २० हजार रुपये कानचैन व टॉप्स १२ ग्रॅम वजनाचे किंमत ३६ हजाराचे सोन्याची पांचाली: ३ ग्रॅम वजनाची (किंमत ९,०००/- रु.) चांदीचे दागिने ५० भार वजनाचे दंडकडे व ब्रासलेट किंमत ३,५०० एकूण किंमत १ लाख ६८ हजार ५०० रुपये.
मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातच अशी धाडसी घरफोडी झाल्याने खळबळ उडाली आहे. मंत्र्यांच्या स्वतःच्या तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून 'सामान्य जनता सुरक्षित आहे का?' असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४/२०२६ नुसार घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.