जळगाव

जळगाव : श्री शिवपुराण कथेत महिला चोरट्यांचा सुळसुळाट; महिला टोळीला अटक

backup backup

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव तालुक्यातील वडनगरी फाटा येथे सुरू झालेल्या श्री शिवमहापुराण कथेच्या पहिल्याच दिवशी तीन महिलांच्या मंगलपोत लांबविल्याची घटना मंगळवारी (दि. ५) उघडकीस आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून या प्रकरणी २७ महिलांवर गुन्हे दाखल केले आहेत. या महिलांवर मध्यप्रदेश राजस्थान व महाराष्ट्रात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यातील एक अल्पवयीन मुलगी सुद्धा आहे. या संशयित आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून अल्पवयीन मुलींना बाल सुधार केंद्रात पाठवण्यात आले आहे.

जळगाव तालुक्यातील वडनगरी फाटा येथे मंगळवारी (दि. ५) श्री शिवमहापुराण कथेला सुरुवात झाली. कथेच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून सर्वच मार्गावर मोठी गर्दी उसळली होती. दोन-दोन तास एकाच ठिकाणी वाहनधारक थांबून होते. शिवाय कथास्थळी देखील मोठी गर्दी झाल्याने या गर्दीचा फायदा घेत हेमलता प्रकाश भावसार (रा. वाघ नगर, जळगाव), सरोज पुरूषोत्तम जोशी (रा. शिवाजी नगर, जळगाव) आणि मंगलाबाई प्रकाश कोळी (रा. नशिराबाद जि.जळगाव) या तीन महिलांच्या एकूण ९६ हजार रूपये किंमतीच्या सोन्याची मंगलपोत लांबविण्यात आल्या. सोनसाखळी चोरीसह चोरीच्या विचाराने संशयितरित्या काही महिला फिरत असल्याचे आढळून येताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल या महिलांना  चौकशीसाठी ताब्यात घेतले.

याप्रकरणी हेमलता प्रकाश भावसार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात २७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील हे करीत आहेत. श्री महापुरण कथेत महिला चोरांची टोळी सक्रीय झाले असून भाविकांनी येतांना सोन्यासह मौल्यवान वस्तू घालू नये आणि सोबत मोजकेच पैसे ठेवावे, असे आवाहन पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी केले आहे.

SCROLL FOR NEXT