जळगाव : “पूर्वी हे शक्य नाही, असं अधिकाऱ्यांचं मत असायचं. मात्र, गेल्या अकरा वर्षांत ‘होय, शक्य आहे – आणि झालेच पाहिजे’ या ब्रीदवाक्याने काम करत सरकारने विकासाचे नवे पर्व सुरू केले. आत्मनिर्भर भारत, विकसित भारत आणि ‘संकल्प ते सिद्धी’ या मंत्रांनी हा काळ ओळखला जाईल,” असे मत मंत्री व आमदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.
भाजप सरकारच्या केंद्रातील अकरा वर्षपूर्तीच्या निमित्ताने पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत चौधरी, राधेश्याम चौधरी, दीपक सूर्यवंशी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
महाजन म्हणाले, “विकसित भारताच्या दिशेने अकरा वर्षांत प्रभावी वाटचाल झाली आहे. ‘अमृतकाल’, सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण ही सरकारची ओळख बनली आहे. मोदी सरकारने सरकारी कामकाजात पारदर्शकता आणली, सुधारणा केल्या आणि कार्यक्षमतेच्या राजकारणाला चालना दिली.”
2014 पूर्वी देशात भ्रष्टाचाराचा विळखा होता, अनेक घोटाळे झाले होते. लाभार्थ्यांपर्यंत सरकारी योजना पोहोचत नव्हत्या. मात्र, गेल्या अकरा वर्षांत DBT प्रणालीद्वारे शंभर टक्के लाभ थेट बँक खात्यांमध्ये पोहोचतो आहे.
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आता दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्यसेवा मिळते. मेक इन इंडिया योजनेमुळे देश वस्तू आणि सेवा निर्यात करू लागला आहे. देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर पोहोचली असून चौथ्या क्रमांकाकडे वाटचाल सुरू आहे.
जीएसटीमुळे आर्थिक व्यवहार सुलभ व पारदर्शक झाले, तर 370 कलम रद्द करून जम्मू-काश्मीरला अखंड भारतात समाविष्ट केल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, उज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, जलविकास मिशन, आयुष्मान भारत आणि किसान सन्मान निधी यांसारख्या योजनांनी गरिबांचा राहणीमान उंचावला आहे. "देश भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा अनुभव घेत आहे," असे महाजन यांनी सांगितले.