Chief Minister Devendra Fadnavis Pudhari News Network
जळगाव

जनजाती नायकांचा मोठा लढा; इंग्रजांनी अपराधी ठरवले नसते तर त्यांनी राज्य केले असते | CM Fadnavis

मुख्यमंत्री फडणवीस : धरणगाव येथे क्रांतीवीर खाज्याजी नाईक स्मारक अनावरण

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : "स्वातंत्र्याचा लढा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केला आणि त्यानंतर विविध मार्गांनी तो पुढे नेला गेला. आदिवासी समाजानेही स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान दिले. मात्र दुर्दैवाने इतिहासाने त्यांच्यावर अन्याय केला. इंग्रजांनी जनजाती नायकांना अपराधी ठरवले, कारण त्यांनी जर प्रेरणा देऊन मोठे जनआंदोलन उभे केले असते, तर इंग्रज भारतात राज्यच करू शकले नसते," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

धरणगाव येथे क्रांतीवीर खाज्याजी नाईक स्मारक अनावरपणाच्या तसेच हिंदू गोरा बंजारा आणि लबाना समाजाच्या कुंभ प्रेरणा स्थळाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार संजय सावकारे, पद्मश्री चेतन पवार, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोळे, देवगिरी प्रांत संघचालक अनिल भालेराव, प्रा. अशोक उइके, शरदराव डोले, जिल्हाधिकारी प्रसाद आणि सीईओ मीनल करणवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, “एखादे चांगले कार्य तुमच्या नशिबात असते, ते तुमच्याच हातून घडते. तुमच्या आशीर्वादानेच मला ख्वाजाजी नाईक स्मारकाचे भूमिपूजन करण्याची आणि आता उद्घाटन करण्याची संधी मिळाली.” असे मुख्यमंत्री म्हणाले.

ख्वाजाजी नाईक यांचा संघर्ष प्रेरणादायी

मुख्यमंत्री म्हणाले की, “इंग्रजांनी ख्वाजाजी नाईक यांना दगाबाजीने पकडले आणि त्यांचा शिरच्छेद केला. त्यांचे शीर सात दिवस धरणगाव रेल्वे स्थानकाजवळ लटकवले गेले. तरीही आदिवासी समाज खचला नाही. ख्वाजाजी नाईक यांनी निर्माण केलेल्या शूरवीरांनी लढा पुढे सुरू ठेवला. आंबा पाणी येथे झालेल्या संघर्षात महिलांनी आणि लहानग्यांनीही शौर्य दाखवले. जर ख्वाजाजी नाईक जिवंत राहिले असते, तर इंग्रजांना या भागातून माघार घ्यावी लागली असती.”

जनजाती नायकांच्या कार्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवणार

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक जिल्ह्यात जनजाती नायकांच्या कार्याची माहिती देणारी प्रदर्शने लावण्याचे काम सुरू केले आहे, जेणेकरून नव्या पिढीला त्यांची माहिती मिळेल," असे मुख्यमंत्री म्हणाले.

आदिवासी समाजासाठी ८० हजार कोटींची गुंतवणूक

“पंतप्रधान मोदी यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी ८० हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. येत्या आठ वर्षांत प्रत्येक कुटुंबाला घर, वीज, शिक्षण, गॅस, पोषण आहार आदी सुविधा पुरवण्यात येतील,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

फूट पाडणाऱ्यांना उत्तर देणे गरजेचे

"काहीजण समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. ख्वाजाजी नाईक हे केवळ एका समाजासाठी नव्हे तर सर्व समाजासाठी लढले. त्यामुळे अशा फूट पाडणाऱ्यांना समाजाने एकत्र येऊन उत्तर देणे आवश्यक आहे," असे आवाहनही त्यांनी केले.

इतिहासात उल्लेखनीय कार्य

“मोहनजोदडो संस्कृतीतही या समाजाचा उल्लेख सापडतो. त्यांनी मोठ्या प्रमाणात समाजसेवा केली आहे. त्यामुळे सरकार सर्वांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे,” असे सांगून त्यांनी जननायकांच्या कार्याची आठवण करून दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT