Sushma Andhare Serious Allegation
सुषमा अंधारे File Photo
जळगाव

‘शिक्षक’साठी पैशाचे वाटप : अंधारे यांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

Nashik Teachers' Constituency 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावात सभा झाल्यानंतर शिक्षक मतदारांना पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

सुषमा अंधारे यांनी ‘एक्स’ या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले.

कुठे आहे निवडणूक आयोग, असा आरोप त्यांनी केला आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी (दि. 26) मतदान होणार आहे.

शनिवारी (दि. 22) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी नाशिक, जळगाव, अहमदनगरमध्ये बैठका घेतल्या.

भावसारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी शिंदेंची विनंती

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांना मदत करण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार गटाचे उमेदवार महेंद्र भावसार यांना केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मुख्यमंत्री शिंदे शनिवारी (22 जून) दराडे यांच्या प्रचारासाठी नाशिक दौर्‍यावर आले असता त्यावेळी फोनवरून त्यांनी भावसार यांना निवडणुकीतून माघार घेऊन दराडे यांना मदत करण्याची विनंती चर्चा केली. तथापि भावसार हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. भावसार यांच्याखेरीज महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने संदीप गुळवे यांना उमेदवारी दिली असून विवेक कोल्हे हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत.

शेअर बाजाराप्रमाणे शिक्षकांचा भाव लावू नका : राऊत

मुख्यमंत्री जर शेअर बाजाराप्रमाणे शिक्षकांचा भाव लावत असतील, तर आपल्या परंपरेला मोठा तडा जाताना दिसत आहे. महाराष्ट्रावरील संस्कारांची थोडी जाण असेल, तर शिक्षकांना या बाजारात उभे करू नका, असा टोला खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना रविवारी लगावला.

केंद्रातील सध्याचे सरकार अस्थिर असून ते ज्या दिवशी कोसळेल, त्या दिवशी पहिली कारवाई निवडणूक आयोगाच्या तीन अधिकार्‍यांवर होईल, असा इशाराही त्यांनी दिला. नाशिक शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांच्या प्रचारार्थ राऊत येथे आले होते.

SCROLL FOR NEXT