जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (जुना ६) वर तरसोद ते फागणे दरम्यानच्या रस्त्याचे काम पूर्ण होऊनही वाहनधारकांच्या नशिबी खडतर प्रवासच येत आहे. तरसोद गावाजवळील सर्व्हिस रोडवरून मुख्य महामार्गावर जाण्यासाठी वाहनधारकांना अक्षरशः कसरत करावी लागत असून सर्व्हिस रोड व मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ताच तयार केला नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे दररोज अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
तरसोद परिसरातील सर्व्हिस रोडवरून मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी कोणताही डांबरी किंवा जोडरस्ता (कनेक्टिंग रोड) करण्यात आलेला नाही. परिणामी, दुचाकीस्वार ते अवजड वाहनधारक कुठूनही महामार्गावर वाहन नेतात.
महामार्ग आणि सर्व्हिस रोडच्यामध्ये केवळ मातीचे थर आणि मोठमोठे खड्डे शिल्लक राहिल्याने अपघाताची शक्यताही वाढली आहे.
तरसोद अंडरपासपासून ते मारुती शोरूमपर्यंतच्या रस्त्याची तर पार दैना झाली आहे. वर्षभरापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, पहिल्याच पावसाळ्यापूर्वी डांबर वाहून गेले असून आता ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?’ असा प्रश्न पडत आहे. वळणावरच तब्बल दोन बाय दीड फुटाचा मोठा खड्डा पडला असून येथे रात्रीच्या वेळी वाहने आदळून अपघातांची मालिका सुरू आहे.
"तरसोद सर्व्हिस रोडवरून मुख्य महामार्गावर जोडणारा योग्य रस्ता लवकरच तयार करण्यात येईल. तसेच रस्त्यावर पडलेले खड्डेही तातडीने बुजवण्यात येतील."
— साळुंखे (उपकार्यकारी संचालक, न्हाई जळगाव