Supriya Sule
लोकसभेनंतर बहिणी 'लाडक्या' झाल्या, सुप्रिया सुळेंचा टोला  
जळगाव

Supriya Sule | लोकसभेनंतर बहिणी 'लाडक्या' झाल्या; सुप्रिया सुळेंचा टोला

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : शिवसेना हा बाळासाहेब ठाकरेंनी वाढवलेला पक्ष, राष्ट्रवादी हा पवार साहेबांनी उभा केलेला पक्ष फोडून चिन्ह हिसकवून नेण्याचे काम अदृश्य शक्ती व भाजपाने केले आहे असा आरोप करत ज्या बहिणी लोकसभेपर्यंत लाडक्या नव्हत्या त्या लोकसभेनंतर लाडक्या झाल्याचा टोला महिला मेळाव्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.

येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, श्रीराम पाटील, रोहिणी खडसे, माजी आमदार राजू दादा देशमुख, माजी आमदार अरुण पाटील, वंदना चौधरी, इंदिरा पाटील, रवींद्र पाटील, श्रीराम पाटील, विशाल देवकर, प्रमोद पाटील, वाल्मीक पाटील आदी उपस्थित होते.

महिला मेळाव्यास मार्गदर्शन करताना खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या, त्या पुढे म्हणाल्या, जळगाव व पवार साहेब यांचे ऋणानुबंध अनेक वर्षापासून आहे. आज काल सरकारी कार्यक्रमात महिला दिसत आहे. मात्र प्रथमच गैरसरकारी कार्यक्रमात महिला पाहून आनंद झाला आहे. निवडणूक व मतदानाच्या वेळी यांना महिलांची आठवण येते. नाहीतर इतरवेळी पक्ष फोडा, घर फोडा हेच आठवते. ठाकरेंनी व पवार साहेबांनी उभा केलेला पक्ष व चिन्ह एका अदृश्य शक्तीने व भाजपाने फोडल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. राज्यात येणारे सरकार महाविकास आघाडीचे असल्याने विरोधक आता घाबरले असल्याचे त्या म्हणाल्या.

चांगल्याला चांगल म्हणावं 

बहिणींना निधी मिळणार आहे म्हणून सरकारचे आभार मानले. चांगल्याला चांगले म्हटलेच पाहिजे असेही त्या म्हणाल्या. अशा दडपशाही सरकारला हद्दपार करावे. मी भीतीने मते घेणार नाही. विश्वासाचे मते मागणार आहेत. लोकसभेपर्यंत बहिणी लाडकी नव्हती मात्र लोकसभेनंतर बहिणी लाडक्या झाल्या असल्याचे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी लगावत अजित पवार यांना नाव न घेता टोला मारला. 48 पैकी लोकसभेमध्ये 31 जागा निवडून आल्या आहेत. मात्र त्यापूर्वी 48 पैकी फक्त तीनच जागा महाविकास आघाडीच्या येतील असे विरोधक म्हणायचे.

तर उपोषणाला बसू

एकेकाळी शेतीवर टॅक्स नव्हता मात्र आता शेतीवर टॅक्स आहे. शेतीच्या बियाण्यांवर, खतांवर मोठ्या प्रमाणात टॅक्स आहे. आपले महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आल्यावर तो टॅक्स शून्यावर आणण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. या सरकारने 27000 कोटी मेट्रो साठी दिले आहे. आमचा मेट्रोला विरोध नाही मात्र गरीब शेतकऱ्यांना हे सरकार का मदत देत नाही म्हणून त्यांनी सरकारचा निषेध केला. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर विकासाबरोबरच शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल. आशा वर्कर यांना पगार मिळाला नाही तर आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू जर यावर तोडगा निघाला नाही तर एक आठवड्यानंतर उपोषणाला बसू असे त्यांनी जाहिर केले.

SCROLL FOR NEXT