जळगाव : शासनाच्या नियमानुसार देशी वा विदेशी दारूची विक्री आणि त्यावरील नियंत्रण हे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जबाबदारीत येते. मात्र, सध्या जळगाव शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारूचा उत आलेला असून, संबंधित विभागाकडून त्यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही.
विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक व्ही. टी. भुकन हे मूळचे नाशिकचे रहिवासी असून, बहुतांश वेळा ते नाशिकमध्येच असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जळगावातील कारभार नाशिकहूनच पाहिला जातो, असा आरोप नागरिकांमधून होत आहे. अधिकारी कधी येतात, कधी जातात, याची कोणालाच माहिती नसते. कार्यालयीन उपस्थितीबाबत देखील कोणतीही पारदर्शकता नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
जळगाव शहरातील तांबापुरा, कंजरवाडा, तसेच ग्रामीण भागातील शिरपूर कन्हाळ (भुसावळ), यावल तालुक्यातील जंगल परिसर, देऊळगाव भोलाणे व कानळदा येथे देशी दारूच्या अवैध भट्ट्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. या ठिकाणी तयार होणारी दारू दररोज चोरट्या मार्गाने जळगाव शहरात पोहचवली जात आहे. त्यामुळे शासनाच्या महसुलाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
पोलीस विभाग काही भागांमध्ये कारवाई करत असला तरी राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र या कारवायांपासून दूर राहतो, ही गंभीर बाब आहे. कारवाई केली जाते तीही केवळ थातूरमातूर स्वरूपात. त्यामुळे हातभट्टी व्यवसाय पुन्हा सुरू होतो आणि तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, सामाजिकदृष्ट्या हा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. यामागे आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय सर्वसामान्य जनतेमध्ये व्यक्त केला जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 'आशीर्वादाने'च हा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. त्यामुळे या अवैध भट्ट्यांवर कठोर कारवाई व्हावी व गावपातळीवर दारूबंदी पूर्णपणे अमलात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.