जळगाव : संक्रांतीच्या मुहूर्तावर सोने खरेदीचे स्वप्न पाहणार्या सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत गेल्या चार दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठा लपंडाव सुरू असून, चांदीने तर आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत थेट 2 लाख 85 हजारांचा टप्पा गाठला आहे. 13 जानेवारी रोजी 2 लाख 66 हजारांवर असलेली चांदी 17 जानेवारी रोजी दोन लाख 85 हजारांवर पोहोचल्यामुळे ग्राहकांचे डोळे विस्फारले आहेत.
गेल्या आठवड्यापासून सराफा बाजारात दरांचे वारू चौफेर उधळले आहेत. दि. 13 जानेवारीला 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 40 हजार 500 रुपये होता. तो मकरसंक्रांतीच्या दिवशी (दि. 14) थेट 1 लाख 42 हजारांवर पोहोचला. त्यानंतर गुरुवारी (दि. 15) काहीशी घसरण होऊन तो 1 लाख 41 हजार 200 रुपयांवर आला. मात्र, हा दिलासा क्षणभंगुर ठरून शनिवारी (दि. 17) पुन्हा सोन्याने डोके वर काढत 1 लाख 41 हजार 600 रुपयांची पातळी गाठली.
सर्वात धक्कादायक वाढ चांदीच्या दरात पाहायला मिळत आहे. दि. 13 जानेवारीला दोन लाख 66 हजार रुपये किलो असलेली चांदी शनिवारी (दि. 17) थेट 2 लाख 85 हजार रुपयांवर पोहोचली. अवघ्या चार दिवसांत किलोमागे तब्बल 19 हजार रुपयांची वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे; मात्र लग्नसराईसाठी खरेदी करणार्या ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे.
24 कॅरेट सोने (प्रति 10 ग्रॅम)
13 जानेवारी. 1,40,500
14 जानेवारी. 1,42,000
15 जानेवारी. 1,41,200
17 जानेवारी. 1,41,600
चांदी (प्रति किलो रुपये)
13 जानेवारी. 2,66,000
14 जानेवारी. 2,82,000
15 जानेवारी. 2,78,000
17 जानेवारी. 2,85,000
एकीकडे शेअर बाजारातील अस्थिरता आणि दुसरीकडे जागतिक घडामोडी यामुळे सोन्या-चांदीचे भाव रोज नवीन उच्चांक गाठत आहेत. सकाळी एक भाव आणि संध्याकाळी दुसराच भाव, अशी परिस्थिती असल्यामुळे खरेदी करावी की थोडे थांबावे? अशा संभ्रमात ग्राहक अडकला आहे.
30 हजारांच्या उंबरठ्यावर (1,29,700) असल्यामुळे मध्यमवर्गीयांचे सोने खरेदीचे स्वप्न महागले आहे. हा दरही खाली-वर होऊ शकतो.