Jalgaon Shooting News |
जळगाव : शहरातील दूध फेडरेशन रोडवर मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. यात एका २५ वर्षीय तरुणाच्या पाठीत गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
नाजीम फिरोज पटेल (वय २५, रा. पाळधी, ता. धरणगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. नाजीम शेप कापण्याचा व्यवसाय करतो. तो आपल्या आई-वडील आणि दोन भावांसह पाळधी येथे राहतो. बुधवारी रात्री १० वाजता नाजीम त्याचे मामा बबलू पटेल व मित्र रोहित देशपांडे, अल्ताफ शेख यांच्यासह चारचाकी (MH-19-Q-7514) ने भुसावळ येथे एका कार्यक्रमासाठी गेला होता. रात्री ११ वाजताच्या सुमारास ते कार्यक्रमस्थळी पोहोचले. कार्यक्रम आटोपून परतत असताना, मध्यरात्री दोन वाजता दूध फेडरेशन रोडवर बबलू पटेल गाडी चालवत असताना अचानक गोळीबार झाला.
या गोळीबारात मागच्या सीटवर बसलेल्या नाजीमच्या पाठीत उजव्या बाजूला गोळी लागली. त्याला तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय राम शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.