जळगाव : जळगाव महापालिका शहर हद्दीतील बाग-बगीच्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून, जळगाव महापालिकेच्या घंटागाडीकडून मेडिकल वेस्टसंदर्भातील शासन नियमबाह्य उल्लंघन सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जेके पार्क (मेहरूण तलावाजवळ) येथील थेट उद्यानात मोठ्या प्रमाणावर मेडिकल वेस्ट टाकण्यात येत असून, याच ठिकाणी कचरा संकलन घंटागाड्यांचे अनधिकृत डेपो तयार झाले आहेत. येथे कचऱ्यातील प्लास्टिक, लोखंड आणि इतर भंगार साहित्य वेगळे करून विक्री केली जात असल्याचे उघड झाले आहे.
देशभरात स्वच्छ भारत मिशन राबवले जात असून, नागरिक आणि शासकीय यंत्रणांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात येते. शहरात कचरा संकलनासाठी घंटागाड्यांची व्यवस्था असून, कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. विशेषतः मेडिकल वेस्टसाठी शासनाने ठरावीक प्रकारच्या गाड्या आणि प्रक्रियेचे नियम घालून दिले आहेत.
मात्र, जळगाव महापालिका हद्दीत शहर परिसरात या नियमांकडे सरार्सपणे दुर्लक्ष होत आहे. जेके पार्क परिसरात ऑपरेशनमध्ये वापरलेले रक्ताने माखलेले सिरींज, पॅकेट कव्हर्स, कापसाचे बोळे, प्लास्टिक साहित्य दुर्लक्षितपणे थेट उघड्यावर टाकण्यात येत आहेत. त्याचबरोबर, घंटागाड्यांचे चालक शहरातून जमा केलेला कचरा येथे आणून, त्यातील भंगार वेगळे करून विक्रेत्यांना बिनधोकपणे विकत आहेत.
या प्रकारामुळे परिसरात दुर्गंधी, प्रदूषण पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या बाबत महानगरपालिकेत संपर्क साधला असता, संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी चौकशी करून कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. आयुक्त निर्मल गायकवाड हे निवडणूक आयोगाच्या बैठकीसाठी गेले असल्याने, तातडीने प्रत्यक्ष हस्तक्षेप होऊ शकला नाही.
शहरातील मुख्य रस्ते आणि आयुक्तांच्या येण्या-जाण्याचे मार्ग स्वच्छ असले, तरी मागच्या गल्ली आणि सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता आहे. ठेकेदारांकडून योग्य पद्धतीने काम होत आहे की नाही, याकडे अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांकडून तक्रार येत आहेत.