जळगाव

Jalgaon news | शेंदुर्णीत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण ऐनवेळी रद्द

Chhatrapati shivaji maharaj statue inauguration cancelled | संतप्त शिवप्रेमींचे आंदोलन, तणावानंतर परिस्थिती नियंत्रणात

पुढारी वृत्तसेवा

शेंदुर्णी : येथे ३ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतरही ऐनवेळी प्रशासकीय मान्यतेचे कारण पुढे करत कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यामुळे शिवप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

सोहळ्यासाठी रोषणाई, स्टेज उभारणी, सजावट आदी सर्व नियोजन पूर्ण झाले होते. पंचक्रोशीतील मान्यवरांना निमंत्रण पत्रिकाही वितरित करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमासाठी तालुक्याचे आमदार तथा कॅबिनेट मंत्री नामदार गिरीश महाजन तसेच राज्यमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह पाच ते सहा मंत्री-आमदारांना निमंत्रित करण्यात आले होते.

काय आहे वाद?

शिवस्मारकासाठी निधी मंजूर होऊन भूमिपूजनानंतर उभारणीस सुरुवात झाली होती. प्रारंभी १९ फेब्रुवारी रोजी पुतळ्याचे लोकार्पण करण्याचे निश्चित झाले होते. मात्र पुतळ्याचे काम पूर्ण न झाल्याने ती तारीख पुढे ढकलण्यात आली. २५ फेब्रुवारी रोजी पुतळा शेंदुर्णीत दाखल झाला आणि ३ मार्च रोजी अनावरणाचा सोहळा निश्चित करण्यात आला. मात्र ऐनवेळी प्रशासकीय परवानग्या अपूर्ण असल्याचे कारण देत कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याने शिवप्रेमींनी ठरलेल्या वेळेतच अनावरण करण्याची ठाम भूमिका घेत स्मारकस्थळी ठिय्या आंदोलन सुरू केले.

आंदोलन व तणाव

सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रतीक्षा करणार असल्याची भूमिका आंदोलकांनी जाहीर केल्याने मोठ्या संख्येने शिवप्रेमी स्मारकस्थळी जमा झाले. वातावरण चिघळण्याची चिन्हे दिसू लागल्याने तहसीलदार नानासाहेब आगळे व पोलीस उपाधीक्षक बापू रोहम यांनी घटनास्थळी ठाण मांडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. काही आंदोलकांनी घोषणाबाजी करत पोलिसांचे बॅरिकेटिंग फेकल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र स्थानिक नागरिक व पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर मंगळवार उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

प्रशासकीय मान्यतेतील त्रुटी

नगरपंचायत प्रशासनाने ९ फेब्रुवारी रोजी परवानगीसंदर्भात पत्रव्यवहार केला होता. २८ फेब्रुवारी रोजी संबंधित विभागांकडून अहवाल मागविण्यात आला; मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंतिम निर्णय प्राप्त झाला नव्हता. या प्रक्रियेत आवश्यक पाठपुरावा न झाल्याची कबुली देत नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी दिलगिरी व्यक्त केली. सर्व तांत्रिक अडचणी दूर करून लवकरच नवीन तारीख जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आरोप-प्रत्यारोप

एक महिन्यापासून सुरू असलेली तयारी आणि मोठा खर्च झाल्यानंतरही कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याने आयोजकांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. “परवानग्या पूर्ण नसताना एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची घोषणा का करण्यात आली?” असा सवाल शिवप्रेमींनी उपस्थित केला आहे. वाया गेलेल्या खर्चाची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त प्रश्नही नागरिकांकडून विचारला जात आहे.

ना. गिरीश महाजन यांच्यावर नाराजी

येथे 3 मार्च रोजी मोठ्या जल्लोषात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येत असल्याची पूर्ण कल्पना तालुक्याचे आमदार तथा संकट मोचक नामदार गणेश भाऊंना होती. त्यांनी शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन त्वरित पावले उचलून ठरलेल्या वेळेतच अनावरण सोहळा पूर्ण करायला पाहिजे होता असे मत अनेक शिवप्रेमींकडून व्यक्त करण्यात येऊन नाराजी व्यक्त करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

प्रकरण गांभीर्याने घेत ज्येष्ठ नेते संजय गरुड यांनी नगराध्यक्ष व संबंधित अधिकाऱ्यांसह जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्रुटींची पूर्तता करण्यासाठी पाठपुरावा सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, वारंवार पुढे ढकलल्या जाणाऱ्या तारखांमुळे शेंदुर्णीतील शिवप्रेमींच्या भावना तीव्र झाल्या असून, सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करूनच अनावरण सोहळा जाहीर करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत शेंदुर्णी नगरपंचायत चे नगराध्यक्ष गोविंद शेठ अग्रवाल यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट झाली असता त्यांनी सांगितले की काही प्रशासकीय त्रुटीमुळे अडचणी आलेल्या होत्या त्या लवकर दूर करून नामदार गिरीश महाजन यांचे चर्चा करून लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण कृती पुतळ्याचे अनावर करण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT