जळगाव | भुसावळ आता 'भुसखेडा' बनले आहे. कॅबिनेट मंत्र्यांसमोर उद्योग, रोजगार, रस्ते, पाणी आणि शासकीय/प्रशासकीय इमारतींसारख्या महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आव्हान आहे. अनेक दशकांपासून भुसावळ फक्त नावापुरतेच राहिले आहे आणि रेल्वे, दीपनगर व काही लहान उद्योगां व्यतिरिक्त मोठे उद्योग येथे आलेले नाहीत. त्यामुळे कॅबिनेट मंत्र्यांसमोर या समस्यांचे निराकरण करणे एक मोठे आव्हान आहे.
जिल्ह्यामध्ये भाजपाच्या कोट्यातून जामनेर व भुसावळला कॅबिनेट मंत्री पद मिळाले आहे. त्यामुळे भुसावळला आजपर्यंतच्या इतिहासामध्ये दुसऱ्यांदाच मंत्रीपद लाभले आहे. त्यामध्ये संजय सावकारेच दोन्ही वेळेस मंत्री होते एक वेळेस राज्यमंत्री व पालकमंत्री आणि आता कॅबिनेट मंत्री झालेले आहेत. त्यांच्यासमोर तालुक्यातील व शहरातील समस्यांचा मोठे आव्हान राहणार आहे.
भुसावळ शहर रेल्वे जंक्शन्स म्हणून किंवा दिपनगर औष्णिक विद्युत केंद्र, वरणगाव आयुध निर्माणी, आरपीडी याच मुख्य कारणांनी त्यांची ओळख आहे. मात्र भुसावळ शहरातील मोठ्या प्रमाणात युवक रोजगारासाठी जळगाव या ठिकाणी जातो. तसेच शैक्षणिक दृष्टीनेही विद्यार्थी पुण्याला महत्व देत आहे व त्या ठिकाणी रोजगाराला तो स्थलांतरित होत आहे.
भुसावळ या ठिकाणी रस्ते रेल्वे व पाणी वीज या सर्व सुविधा असतानाही या ठिकाणी मोठे उद्योजक येऊ शकले नाही. भुसावळला लागून असलेली एमआयडीसी ही लघु उद्योगांची एमआयडीसी झालेली आहे. मोठ्या प्रमाणात युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देईल अशी कोणतेही उद्योग किंवा उद्योग कारखाना या ठिकाणी आलेला नाही. जो एकेकाळी खडका या गावाची ओळख राज्यभर होती ती सूतगिरणी अनेक वर्षापासून बंद पडलेली आहे.
भुसावळ शहर हे फक्त नावाला राहिलेले आहे. भुसावळचा इतिहास असलेली नगरपालिकेची इमारत पडून आज कित्येक वर्ष झाले मात्र प्रशासनाकडून इमारत निर्माण करण्यासाठी अधिकारी किंवा नेते यांच्याकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही किंवा पाठपुरावा झालेला नाही त्यामुळे आजही सांस्कृतिक भवनात नगरपालिका सुरू आहे. तापी नदी असूनही हातनुर धरण जवळ असूनही भुसावळ शहरांमध्ये पाण्याची समस्या सोडवण्यात नगरपालिका व प्रशासन अपयशी ठरलेले आहे. शहरात पंधरा दिवसांनी आज पाणीपुरवठा होत आहे. अमृत योजनेच्या दोनच्या टप्प्याच्या कामाला अजूनही सुरुवात झाली नाही पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी सात वर्ष उलटूनही वाट पहावी लागत आहे.
तालुक्यातील असलेली छोटी तलाव यामध्ये पावसाचे पाणी साचत नसल्याने वेल्हाळा तलाव सोडल्यास कुठेही तलाव पूर्णपणे भरत नाही मात्र याकडे लघुपाटबंधारे विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. तरी नवीन कॅबिनेट मंत्री याकडे लक्ष देतील का? शहरवासीयांचा महत्त्वाचा मुद्दा असलेल्या रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या बस स्थानक चा प्रश्न सुटेल का? आजही या ठिकाणी खडी किंवा डांबर टाकून प्रवाशांना त्या दगडांमधून प्रवास करावा लागत आहे संयुक्त बस डेपो प्रवाशांना मिळणार का , आजही प्रवाशांना धूळयुक्त वातावरणातूनच प्रवास करावा लागणार आहे.
कॅबिनेट मंत्री झाल्या नंतर संजय सावकारे याकडे लक्ष देतील का व यामधील प्राधान्याने कोणत्या समस्या सुटतील याकडे शहराचे नवे तर तालुक्याचेही लक्ष लागून आहे.