जळगाव: वाळू माफियांकडून हप्ते उकळणाऱ्या आणि गोरगरिबांना नियमांचा धाक दाखवणाऱ्या महसूल विभागातील दोन भ्रष्ट तलाठ्यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) चांगलाच धडा शिकवला. गिरणा नदीपात्रातून वाळूने भरलेला ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना उत्राण (ता. एरंडोल) येथील दोन तलाठ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
झडतीमध्ये एका तलाठ्याकडे रोख १ लाख ७३ हजार रुपये आणि चक्क 'पॉल जॉन' व्हिस्कीची महागडी बॉटल आढळून आल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. नरेश भास्कर शिरूड (वय ४१, तलाठी, सजा उत्राण अहिर) आणि शिवाजी एकनाथ घोलप (वय ४६, तलाठी, सजा उत्राण गुजर) अशी एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या संशयित लाचखोर तलाठ्यांची नावे आहेत.
यातील तक्रारदाराचे वाळूने भरलेले ट्रॅक्टर आरोपी नरेश शिरूड याने २७ जानेवारीला गिरणा नदीपात्रात पकडले होते. मात्र, कायदेशीर कारवाई करण्याऐवजी त्याने ते सोडून दिले. त्यानंतर कारवाई न केल्याचा मोबदला म्हणून त्याने २५ हजारांची मागणी केली. "मी इतरांकडून जास्त घेतो, पण तू गरीब आहेस म्हणून तुझ्याकडून फक्त ३० हजार घेतो," असा अजब संवाद साधत ३० हजार रुपयांची लाच निश्चित करण्यात आली. तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतल्यानंतर आज (दि. २८) सापळा रचण्यात आला. एरंडोल येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वरती असलेल्या एका खोलीत हा व्यवहार ठरला. यावेळी नरेश शिरूड याच्या सांगण्यावरून आणि प्रोत्साहनावरून दुसरा तलाठी शिवाजी घोलप याने ३० हजार रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांच्या मुसक्या आवळल्या.
कारवाईनंतर नरेश शिरूड याची झडती घेतली असता, त्याच्याकडे १ लाख ७३ हजार ३०० रुपये एवढी मोठी रोख रक्कम आढळून आली. याशिवाय, गिफ्ट रॅपरमध्ये पॅक केलेली २९५० रुपये किमतीची 'पॉल जॉन' कंपनीची व्हिस्कीची बॉटलही सापडली. ही रक्कम आणि दारूची बाटली नेमकी कोणाकडून आली? हे 'वाळूचे' पैसे आहेत की आणखी कोणाचे? याबाबत आता जोरदार चर्चा रंगली आहे. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे पोलीस निरीक्षक हेमंत नागरे प्रदीप कोड अमोल सूर्यवंशी सचिन चाटे या पथकाने केली.