जळगाव : मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीदरम्यान एका मतदान केंद्रावर मारहाणीचा प्रकार घडला. या प्रकरणी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी शिवसेना (शिंदे गट) आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांत तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
घडलेला प्रकार असा...
भाजपचे उमेदवार आणि कार्यकर्ते मतदानासाठी केंद्रावर पोहोचले असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी त्यांची वादावादी झाली. या वादातून मारहाणीचा प्रकार घडल्याचा आरोप रक्षा खडसे यांनी केला आहे. भाजपच्या अल्पसंख्यांक विभागाचे जहांगीर खान यांच्या सुनेची निवडणूक असल्याने त्यांचे नातेवाईक मतदानासाठी गेले असताना दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव वाढला आहे.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण करताना दिसतात. भाजपचा कार्यकर्ता बचावाचा प्रयत्न करताना आणि आमदार संबंधित कार्यकर्त्याला दूर ढकलताना या दृश्यात दिसतो आहे. आमदार चंद्रकांत पाटील भाजप पदाधिकाऱ्यांशी बोलत असताना झालेल्या गोंधळाचाही व्हिडिओ समोर आले आहेत.
रक्षा खडसे यांनी केले आरोप
रक्षा खडसे यांनी पोलिसांत आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करत काही गंभीर आरोप केले आहेत. मतदान केंद्रात गळ्यात पक्षाचा मफलर टाकून फिरल्यामुळे आमदारांनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप केला आहे. भाजप कार्यकर्त्याला आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याने आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. व्हिडिओ आणि फोटो पुराव्यासह तक्रार मुख्यमंत्री, निवडणूक आयोग आणि डीआयजी यांना पाठवण्यात आले आहे. मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत राजकीय प्रचाराला मनाई असताना त्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजप कार्यकर्त्याला मारहाण होत असताना युतीधर्म कुठे होता आणि मुक्ताईनगरमध्ये इतका तणाव कसा निर्माण झाला.
या प्रकरणी जहांगीर खान यांनी पोलिसांत फिर्याद केली आहे. पोलीस उपाधीक्षक सुभाष ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपासात इतरांची नावे समोर आल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. मतदारांवर प्रभाव टाकणे, धक्काबुक्की, धमकी आणि दंगलीचे कलम यानुसार गुन्हा नोंदवला आहे. आमदारांचा नेमका सहभाग तपासात स्पष्ट होईल. हा प्रकार मतदानापेक्षा अधिक चर्चेचा विषय ठरला आहे. पुढील कारवाई आणि दोन्ही पक्षांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.