मृत्यूच्या काही तासांपूर्वी प्रतीक्षा पाटील यांनी सोशल मिडीयावर लिहिलेल्या भावनिक पोस्टमुळे अश्रू अनावर झाले आहेत. Pudhari News Network
जळगाव

'मैत्रिणींनो मस्त जगा...' : प्रतिक्षाच्या पोस्टने अश्रू झाले अनावर

Pratiksha Patil Emotional Post | आज माझ्याकडे काय नाहीये... गाडी, बंगला आहे...

अंजली राऊत

चाळीसगाव : पुढारी ऑनलाइन डेस्क | 'आज माझ्याकडे काय नाहीये... गाडी आहे. बंगला, क्लास वन पती अधिकारी आहे... मात्र आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही... त्यामुळे मैत्रिणींनो मस्त जगा... छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा... तुलना करू नका...' मृत्युपूर्वी काही तासांपूर्वी समाजमाध्यमांवर लिहिलेली ही भावनिक पोस्ट 28 वर्षीय प्रतीक्षा समाधान पाटील यांची आहे.

मुख्याध्यापिका म्हणून काम पाहिलं

27 फेब्रुवारी रोजी प्रतीक्षा पाटील या विवाहितेचा कर्करोगाने दुर्दैवी अंत झाला झाला. गेल्या वर्षभरापासून त्यांचा कर्करोगाशी तीव्र लढा सुरू होता. वडील मनोज आत्माराम पाटील हे ग. स. पतसंस्थेचे माजी अध्यक्ष आहेत. प्रतीक्षा यांचे शिक्षण एम.ए डी.एड होते. कुसुंबा (ता. जळगाव) येथील स्वामी समर्थ विद्यालय प्राथमिक शाळेत त्या मुख्याध्यापिका म्हणून काम पाहत होत्या. मृत्यूपूर्वी महिलांना उद्देशून लिहिलेली त्यांची ही भावनिक पोस्ट जिल्ह्यात सर्वत्र व्हायरल होत आहे. समाजमाध्यमांवरील त्यांच्या पोस्टने अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या आहेत.

जिभेवर फोड आल्याच झालं कारण अन्... गाठीचं रुपांतर कर्करोगात

प्रतीक्षा समाधान पाटील यांचा विवाह वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी यावल वनविभागातील वनाधिकारी क्लास वन अधिकारी समाधान पाटील यांच्याशी झाला. ते जळगाव येथेच वास्तव्यास होते. सुरुवातीला जिभेवर फोड आल्यानंतर प्रतीक्षा यांनी त्यावर उपचार केले. तीन महिने उपचार सुरूच होते. मात्र, यानंतर जिभेला गाठ झाली. तपासणीदरम्यान गाठ कर्करोगाची असल्याचे निदान झाल्याने त्यांचे कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले. कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारालाही त्या सामोरे गेल्या. अवघ्या वीस दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यात त्यांची जीभ शरीरापासून वेगळी करण्यात आल्याने त्यांचे वजन दहा किलोने कमी झाले. आपल्याला आता बोलता येणार नाही याचे दुःखही त्यांनी या भावनिक पोस्टमध्ये व्यक्त केले आहे. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या वीस दिवसांनंतर शेवटी मृत्यूने त्यांना गाठलेच.

छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा... जीवन जगा

या भावनिक पोस्टमध्ये त्या हृद्यद्रावक संदेश लिहितात की... "मैत्रिणींनो, आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतो. आयुष्यात सगळे समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो; पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना... त्याला जीवनाची किंमत कळते. तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा... जीवन जगा..." असा संदेश देणाऱ्या प्रतीक्षा यांच्या सकारात्मतेच्या विचाराने त्यांनी जाता जाता इतरांच्या जीवनातील चितेंची चिता होऊ देऊ नका असा जणू संदेशच दिला आहे.

त्यांच्या पश्चात पती, वडील, आई, एक भाऊ व एक बहिण असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रात एक मोठा हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT