Illegal Country Liquor Dens
जळगाव: भुसावळ तालुक्यात अवैध गावठी दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात तालुका पोलिसांनी गुरुवारी पहाटे धडक मोहीम राबवली. दिपनगर, कुऱ्हा, साकेगाव आणि किन्ही बीट व दूरक्षेत्रांतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत दारूबंदी कायद्यान्वये १० गुन्हे दाखल करण्यात आले. यावेळी गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे तब्बल २ हजार ८०० लिटर सडवा रसायन जागीच नष्ट करण्यात आले. तसेच २७० लिटर तयार गावठी दारूसह एकूण १ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दिवाळी आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी पहाटे चार वाजल्यापासून छापेमारी सुरू केली. पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. कन्हाळा, साकेगाव, पिंप्रीसेकम, फेकरी आणि वराडसीम परिसरातील गावठी दारूच्या अड्ड्यांवर अचानक छापे टाकण्यात आले. या कारवाईत दारू निर्मितीसाठी साठवून ठेवलेले मोठ्या प्रमाणातील रसायन नष्ट करण्यात आले.
या कारवाईत अशोक धनासिंग तायडे (वय ५१, रा. पिंप्रीसेकम), रितेश प्रकाश सूर्यवंशी (वय २८, रा. फेकरी), निवृत्ती दगडू सोनवणे (वय ४५, रा. बेलदारच), विलास गोविंदा सपकाळे (वय ५८, रा. वराडसीम), सागर मधुकर सोनवणे (वय ३०, रा. साकेगाव), भगवान भिमराव कोळी (वय ३८, रा. साकेगाव), केशव माधव मराठे (वय ५०, रा. साकेगाव), उस्मान हसन गवळी (वय ४९, रा. कन्हाळा), खलील हसन गवळी (वय ३९, रा. कन्हाळा) आणि युनूस हसन गवळी (वय ४३, रा. कन्हाळा) अशा दहा जणांविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत रामदास दरेकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली. पोलीस हेडकॉन्स्टेबल वाल्मीक सोनवणे, सुभाष तडवी, विकास बाविस्कर, सुधीर विसपुते, इश्तियाक शेख, पोलीस नाईक हेमंत मिरकली, पोलीस कॉन्स्टेबल रशीद तडवी, सुभाष सोनवणे, सचिन पारधी, न्यायजोद्दीन तडवी, किरण तायडे, जगदीश भोई आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल लीना मधुकर लोखंडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
या धडक मोहिमेमुळे तालुक्यातील अवैध गावठी दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, अशा अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे.