crime News pudhari photo
जळगाव

Jalgaon Gramsevak Murder: ग्रामसभेत ग्रामसेवकाला बेदम मारहाण, पळून जाताना मृत्यू; शिवरे येथे नेमकं काय घडलं?

ग्रामसभेत थेट शासकीय कर्मचाऱ्यालाच लक्ष करून जीव घेण्यापर्यंत जमावाची मजल गेल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Crime News

जळगाव : शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या ग्रामसेवकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेदरम्यान जुन्या बिलांच्या क्षुल्लक वादातून ५२ वर्षीय ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांना सात जणांनी बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळून जात असताना पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

१७ ऑगस्ट रोजी ही संतापजनक घटना घडली. याप्रकरणी पारोळा पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एका संशयित मुख्य आरोपीला गजाआड केले आहे. ग्रामसभेत थेट शासकीय कर्मचाऱ्यालाच लक्ष करून जीव घेण्यापर्यंत जमावाची मजल गेल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ग्रामसभेत नेमकं काय घडलं?

शिवरे येथील ग्रामसभेत जुन्या बिलांना मंजुरी देण्यावरून हल्लेखोरांनी ग्रामसेवक पाटील यांच्याशी वाद उकरून काढला. वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. जमावाने पाटील यांना घेरून शिवीगाळ करत तुफान मारहाण केली. या जीवघेण्या हल्ल्यातून सुटका करून पळ काढत असतानाच पाटील यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ अंतर्गत गुन्हा (क्र. ३१५/२०२६) दाखल केला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत फरार होण्याच्या तयारीत असलेल्या एकाला बेड्या ठोकल्या. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

दरम्यान, मृत ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांच्या पार्थिवावर आज, १८ ऑगस्ट रोजी बोधर्दे (ता. पारोळा) या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. अंत्यसंस्काराच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बोधर्दे व शिवरे परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT